मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोल्हापुरातून हवाई सेवा वाढवा | पुढारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोल्हापुरातून हवाई सेवा वाढवा

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, औरंगाबाद व नांदेड येथील विमानतळावरून अधिक क्षमतेने हवाई सेवा सुरू व्हावी आणि या भागाचा फायदा व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे आग्रही भूमिका घेतली.

या विमानतळांचा नियमित प्रवाशांना व पर्यटकांना फायदा होणार असल्याने तांत्रिक अडचणी तातडीने दूर करा, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर चिपी विमानतळामुळे कोकणला मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत व त्या समोरील अडचणी सोडविण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी दूरद‍ृश्यप्रणालीद्वारे बैठकीत संवाद साधला.

कोल्हापूर, औरंगाबाद व नांदेड येथील विमानतळाच्या अडचणी दूर करण्याबाबत आग्रही भूमिका घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामुळे जिल्ह्याला आणि राज्याला फायदा होणार असल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचा कोकणला व राज्याला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.

सोलापूर, नागपूर, जळगाव, अकोला, गोंदिया व अमरावती येथील हवाई वाहतूक व दळणवळण वाढविण्यासाठी येणार्‍या अडचणी दूर करण्याकरिता राज्य सरकार व नागरी विमान वाहतूक मंत्रालय यांनी संयुक्‍तपणे कालबद्धरीतीने काम करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्‍त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, सचिव आशिष कुमार सिंह व प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

Back to top button