रिअल इस्टेट ला मुंबईत पुन्हा ‘अच्छे दिन’ | पुढारी

रिअल इस्टेट ला मुंबईत पुन्हा ‘अच्छे दिन’

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान विक्री झालेल्या घरांच्या आकड्याने यापूर्वीच्या चार वर्षांचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. 2017 ते 2019 या लॉकडाऊनपूर्वीच्या काळात झालेल्या विक्रीपेक्षा यावर्षी घरांची विक्री अधिक झाली. क्रेडाई-एमसीएचआयने प्रसिद्ध केलेल्या ‘एमएमआर हाउसिंग रिपोर्ट 2021’ नुसार दरवर्षी होणार्‍या घर विक्रीची तुलना करता गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदाचे वर्ष महामुंबई प्रदेशातील रिअल इस्टेट क्षेत्राला अच्छे दिन देणारे ठरले आहे.

मुंबई महानगरात यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत तब्बल 1 लाख 71 हजार 165 घरांची विक्री (रिअल इस्टेट) झाली. ही उलाढाल 1 लाख 33 हजार 15 कोटी रुपयांची आहे. हा कल कायम राहिल्यास 2021 साल हे यापूर्वीचे घरविक्रीचे सर्व विक्रम मोडीत काढेल, असा विश्वास क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष दीपक गोराडिया यांनी व्यक्त केला.

मुद्रांक शुल्कात (स्टँप ड्युटी) कपात, गृह कर्जाच्या दरांमधील घट, विकास कांकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या ऑफर्स आणि कोरोनामुळे स्वतःचे घर असण्याला मिळालेले महत्त्व यांमुळे विक्रीत चांगली वाढ झाल्याचे दिसते. दसरा आणि दिवाळी हे महत्त्वाचे सण असल्याने यावर्षी ही तेजी कायम राहील, असा अंदाज गोराडिया यांनी वर्तवला आहे.

* दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईत रेकॉर्ड ब्रेक घर विक्री झाली. 2017, 2018 आणि 2019 या कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान अधिक घरांची विक्री झाली.

* दक्षिण मुंबईत विक्री झालेल्या घरांपैकी तब्बल 90 टक्के घरे ही 2 कोटी रुपयांहून अधिक किंमतीची आहेत.

* पूर्व उपनगरां मध्येही यावर्षी विक्री झालेल्या घरांची संख्या, त्यांची एकूण किंमत आणि क्षेत्रफळ हे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. यावर्षी पूर्व उपनगरातही 80 टक्के घरांची किंमत ही 1 कोटी रुपयांहून अधिक आहे.

* पश्चिम उपनगर हे मुंबईचे सर्वात मोठे मॅक्रो-मार्केट असून जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत गेल्या चारही वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक विक्री झाली आहे.

* गेल्या 5 वर्षांत ठाणे जिल्ह्यामध्ये घरांच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे. मुंबईच्या तुलनेने ठाणे जिल्ह्यात अधिक स्वस्त घरे असून जास्त किंमतीच्या युनिट्सच्या विक्रीमध्येही येथे वाढ नोंदवण्यात आली आहे.

Back to top button