मुंबई-पुणे महामार्गावर विशेष सुरक्षा मोहीम | पुढारी

मुंबई-पुणे महामार्गावर विशेष सुरक्षा मोहीम

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने येत्या १ डिसेंबरपासून विशेष सुरक्षा मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सहा महिन्यांसाठी ही सुरक्षा मोहीम राबविण्यात येणार असून यात १२ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात ३० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ६ पथके आणि १५ अधिकारी या दोन्ही महामार्गावर २४ तास कार्यरत राहणार आहेत.

गेल्या काही वर्षात मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या महामार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या अपघातांमध्ये जखमी आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. २०२१ मध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर २०० अपघात झाले. त्यात ८८ जणांचा मृत्यू झाला. १४६ जण गंभीर जखमी झाले. जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान १६८ अपघातांमध्ये ६८ जणांनी आपला जीव गमावला तर ९२ गंभीर जखमी झाले.  २०२१ मध्ये जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर २७८ अपघात झाले. त्यात १४९ जणांचा मृत्यू तर १४४ गंभीर जखमी झाले. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात २३१ अपघातात १०२ जणांनी आपला प्राण गमावला. तसेच १६० जण गंभीर जखमी झाले.

या दोन्ही मार्गामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रस्ते अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार परिवहन विभागाने या दोन्ही मार्गावर सहा महिन्यांची सुरक्षा मोहिम हाती घेतली असल्याची माहिती रस्ता सुरक्षा कक्षाचे परिवहन उपायुक्त आणि ताडदेव आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.

२४ तास पहारा !

सुरक्षा मोहिमेकरिता मुंबई, पुणे, पनवेल आणि पिंपरी चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांमधून १२ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात ३० अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यातील ६ पथके आणि १५ अधिकारी हे या दोन्ही महामार्गावर २४ तास कार्यरत राहणार आहेत.

…अशी असेल मोहीम

अपघातग्रस्त ठिकाणांचे सर्वेक्षण करणे, उपाययोजना राबविणे, चालकांच्या माहितीकरिता घडलेल्या अपघातांची माहिती देणारे बोर्ड लावणे, अवैधरित्या पार्क केलेल्या वाहनांवर तात्काळ कारवाई करणे, महामार्गावरील टोल नाक्यांवर उद्घोषणा करुन जनजागृती करणे, इंटरसेप्टर वाहनांच्या माधमातून अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, उजव्या मार्गिकेवरून कमी वेगाने चालणारी वाहने (ट्रक, बस, कंटेनर) यांच्यावर कडक कारवाई करणे.

जीवन अनमोल आहे !

 ८० टक्के पेक्षा जास्त रस्ते अपघात मानवी चुकांमुळे होतात. चालकांचा निष्काळजीपणा, बेफिकिर वृत्ती, वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने अपघात घडतात. त्यामुळे चालकांनी आणि नागरिकांनी देखील वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन स्वत:चा आणि इतराचे प्राण जपावेत. जीवन हे अनमोल आहे. त्यमुळे आपल्या व इतरांच्या जीवालाही जपा.
विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य

Back to top button