Raj Thackeray criticises : कधीही बाहेर न पडणारे आता फिरत आहेत; उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता राज ठाकरे यांची टीका | पुढारी

Raj Thackeray criticises : कधीही बाहेर न पडणारे आता फिरत आहेत; उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता राज ठाकरे यांची टीका

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; प्रकृतीचे कारण सांगून एरव्ही कधीही बाहेर न पडणारे आता सगळीकडे फिरत आहेत. सत्तेसाठी त्यांनी कोणालाही सोबतीला घेतले, अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

मुंबईतील नेस्को ग्राऊंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा झाला. ते म्हणाले की, महाराष्ट्राचा सध्या सगळ्या बाजूने खोळंबा झालाय. त्यामुळे नक्की काय होणार, या गटाला मान्यता मिळणार की नाही मिळणार, यांची निशाणी मिळणार की नाही मिळणार, यातच सगळे दंग आहेत. त्यांची डोकी त्यांना खाजवू द्या, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.प्रकृतीचे कारण सांगून घरात बसणार्‍यांना एकनाथ शिंदे यांनी एका रात्री अशी काही कांडी फिरवली की ते आता सगळीकडे फिरत आहेत. सत्तेसाठी कधी याच्याशी जवळीक, कधी त्याच्याशी, उद्दिष्ट एकच ‘मला सत्तेत बसवा’, असे सांगत राज ठाकरे यांनी बंधू उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.

…तर ट्रकमध्ये स्पीकर लावून हनुमानचालिसा

राज ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे उतरले पाहिजेत, अशी इच्छा वारंवार व्यक्त केली होती. त्यांची इच्छा आपण पूर्ण केली. आम्ही भोंगे काढा असे नाही म्हणालो. अजून काही ठिकाणी ते सुरू आहेत. ते बंद झाले नाही तर मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर लावून हनुमानचालिसा लावा, असे आवाहनही त्यांनी मनसैनिकांना केले.

Raj Thackeray criticises : महापुरुषांची बदनामी थांबवा

तुम्ही या नेत्यांचा अपमान करा आम्ही त्यांचा करतो, असले प्रकार दोन्ही बाजूंनी थांबायला हवेत. स्वातंत्र्ययोद्धे आणि महापुरुषांच्या बदनामीने हाती काही लागणार नाही. आपल्याच देशातील या लोकांचा अपमान करून जो चिखल तयार केला जात आहे, त्यामुळे नव्या पिढीसमोर आदराची स्थानेच उरणार नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपने हे प्रकार थांबवावेत, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. राज यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला. तर, राज्यपाल पदावर बसला आहात म्हणून मान राखतो, नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही, अशा शब्दांत त्यांनी राज्यपाल कोश्यारींना फटकारले.

Back to top button