कोविशिल्ड म्हणजेच अॅस्ट्राझेनेका, पण चिंता नको! | पुढारी

कोविशिल्ड म्हणजेच अॅस्ट्राझेनेका, पण चिंता नको!

मुंबई : पुढारी डेस्क : कोरोना प्रतिबंधक अॅस्ट्राझेनेका लसीमुळे अपवादात्मक प्रकरणात थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम किंवा टीटीएस होऊन रक्तात गुठळ्या तयार होऊन प्लेटलेटस्ची संख्या कमी होते, अशी कबुली अॅस्ट्राझेनेका कंपनीने ब्रिटिश न्यायालयात दिल्यानंतर खळबळ उडाली असताना भारतीयांनी मात्र यामुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ आणि मुंबईतील पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशनचे महासचिव डॉ. ईश्वर गिलाडा यांनी म्हटले आहे.

डॉ. गिलाडा यांनी सांगितले की, भारतात ९० टक्के म्हणजे सुमारे ९० कोटी लोकांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लस घेतली होती. ही खरे तर अॅस्ट्राझेनेका लसच होती. जागतिक आरोग्य संघटनेने अन्य लसींप्रमाणे ही लसही तातडीच्या वापराच्या नियमांतर्गत मानवी वापरासाठी मंजूर केली होती. या लसीमुळे जोखमींपेक्षा फायदाच अधिक असल्याचे दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत स्पष्ट झाले होते. प्रत्यक्षात ही लस घेतल्यानंतर काहींना टीटीएस या दुर्मीळ परंतु अत्यंत गंभीर प्रतिकूल परिणामाला सामोरे जावे लागले, हे खरे असले तरी त्याचे प्रमाण अवघे ०.००२ टक्के आहे. लसीचे फायदे लसीच्या दुर्मीळ दुष्परिणामांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहेत. त्यामुळे लस घेतलेल्या प्रत्येकाने भीती बाळगण्याची गरज नाही.

अनुवांशिकरित्या तयार केलेल्या व सुधारित लसींमधील एडेनो विषाणू चुंबकांप्रमाणे काम करतात. रक्तातील प्रथिने ज्याला प्लेटलेट फॅक्टर ४ (पीएफ४) म्हटले जाते, त्याचा वापर आपले शरीर रक्त गोठण्यास प्रोत्साहन देण्यासाठी करते. हातात लस टोचताना काही वेळा लहान भाग रक्तवाहिन्यांत प्रवेश करू शकतात. नंतर क्वचित प्रसंगी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पीएफ-४ ला गोंधळात टाकून त्यावर हल्ल्यासाठी अँटीबॉडीज सोडतात. अशी प्रतिपिंडे नंतर पीएफ ४ सोबत एकत्र येतात. यातून रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. मेंदू व हृदयातील अशा गुठळ्या घातक प्रतिकूल परिणामांना कारणीभूत ठरू शकतात. ब्रिटनस्थित अॅस्ट्राझेनेका लसीशी संबंधित खटल्यातील वादीच्या मेंदूत असेच घडले होते.

गुंतागुंत कशामुळे हे सांगणे अवघड

कोविडनंतर अनेकांच्या शरीरात निर्माण झालेली गुंतागुंत ही प्रत्यक्ष कोरोनामुळे झाली की लसीमुळे हा फरक करणे अवघड आहे. यारून निर्माण झालेला वाद वैज्ञानिक क्षेत्रासाठी अविभाज्य भाग आहे. अशा प्रकरणांत संशयाचा फायदा नुकसान झालेल्यांना मिळतो आणि जणू अॅस्ट्राझेनेका किंवा कोविशिल्ड लसींमुळेच नुकसान झाले, असा अर्थ काढला जातो, असेही डॉ. गिलाडा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button