मुंबई : ‘साखळी ओढ्यांचा’ मध्य रेल्वे प्रशासनाला ताप! | पुढारी

मुंबई : ‘साखळी ओढ्यांचा’ मध्य रेल्वे प्रशासनाला ताप!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेने उपनगरीय आणि मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये चेन पुलिंगचा दिलेला पर्याय प्रशासनाला अलिकडे तापदायक ठरू लागला आहे. आपल्या सोईसाठी प्रवासी या सुविधेचा गैरवापर करीत असून त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडत आहे. एप्रिल 2022 ते 26 ऑक्टोबर 2022 या सात महिन्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात अनावश्यकपणे चैन ओढल्याच्या 1706 घटनांची नोंद झाली आहे. यातील 1169 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

प्रवासी उशिरा पोहोचल्यामुळे किंवा मधल्याच स्थानकांवर उतरण्या-चढणे चैन ओढून गाडी थांबवत असल्याचे रेल्वे
प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याचा परिणाम केवळ त्याच गाडीवर होत नसून पाठिमागून येणार्‍या गाड्यांवरही होत आहे. इतकेच नाही तर त्यामुळे मेल/एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडत आहे. या गाड्यांना उशीर होत आहे.

एक प्रवाशाच्या सोईसाठी इतर प्रवाशांची मोठी गैरसेाय होत आहे. मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या उशिराने धावतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते. तसेच एका प्रवाशाच्या सोयीसाठी या सुविधेचा गैरवापर
केल्याने इतर प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनावश्यकपणे चैन ओढणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा असून गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आपली ट्रेन सुटण्याच्या किमान 30 मिनिटे आधी
टर्मिनस अथवा स्टेशनवर पोहोचण्याचा सल्ला मध्य रेल्वेने दिला आहे.

  • गरज नसताना चेन ओढल्याने इतर प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय
    गाड्या यामुळे उशिराने धावतात

मध्य रेल्वेची कारवाई

चेन पुलिंगच्या घटना 1,706
कालावधी 1 एप्रिल ते 26 ऑक्टोबर 2022
कारवाई 1,169 प्रवाशांवर
दंड वसुली 5.85 लाख रुपये

Back to top button