पत्राचाळ घोटाळ्यात शरद पवारांची तत्काळ चौकशी करा : अतुल भातखळकर | पुढारी

पत्राचाळ घोटाळ्यात शरद पवारांची तत्काळ चौकशी करा : अतुल भातखळकर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पत्राचाळ घोटाळ्यात ईडीच्या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. आता या आरोपपत्रानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता याच आरोपपत्रावर बोट ठेवत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्राचाळ प्रकरणात तत्काळ चौकशी करण्याची विनंती सरकारकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

भातखळकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. या प्रकरणात बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य आहे. ईडीच्या आरोपपत्रात शरद पवार यांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

पत्राचाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकऱणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रानुसार, २००६-०७ मध्ये पत्राचाळीच्या पुनविर्कासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यामध्ये संजय राऊत, म्हाडा अधिकारी व अन्य सहभागी झाले होते. त्यावरून आता आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चौकशीची मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button