सत्ता केवळ माध्यम; सेवा हेच लक्ष्य : पंतप्रधानांचे भाजपच्या महापौर, उपमहापौरांना मार्गदर्शन | पुढारी

सत्ता केवळ माध्यम; सेवा हेच लक्ष्य : पंतप्रधानांचे भाजपच्या महापौर, उपमहापौरांना मार्गदर्शन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: राजकारणात केवळ सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी आलो नाही. सत्ता केवळ माध्यम आहे. परंतु, सेवा हेच लक्ष्य आहे. सुशासनाच्या माध्यमातून जनतेची कशाप्रकारे सेवा करता येईल, यासाठीच आम्ही काम करीत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दोन दिवसीय राष्ट्रीय महापौर संमेलनातील प्रतिनिधींना संबोधित करताना व्यक्त केले.

गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित या संमेलनात उपस्थित भाजपचे महापौर आणि उपमहापौरांना पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करीत ‘शहरी विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले.

देशवासीय गेल्या अनेक काळापासून शहरी विकासासाठी भाजपवर विश्वास ठेवत आले आहेत. हा विश्वास भविष्यातही असाच कायम ठेवण्याचा, त्याला अधिक वृद्धिंगत करण्याचे दायित्व आपल्या सर्वांचे आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ची वैचारिकताच भाजपला इतर पक्षांपासून वेगळी करते, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

पंतप्रधान म्हणाले की, २०१४ पर्यंत देशातील मेट्रोचे जाळे २५० किलोमीटर पेक्षाही कमी होते. पंरतु, आज देशातील मेट्राचे जाळे ७७५ किलोमीटरहून अधिक पसरले असून १ हजार किलोमीटरच्या नवीन मेट्रो मार्गांवर काम सुरू आहे. देशातील शहरे समग्र जीवनशैलीचे भागीदार बनावेत, असा प्रयत्न आमचा आहे. देशात आता १०० हून अधिक शहरांमध्ये स्मार्ट सुविधांची उभारणी केली जात आहे. या अभियानाअंतर्गत देशभरात ७५ हजार कोटींहून अधिक निधी खर्च करून प्रकल्प उभारले जात आहे. हे शहरे भविष्यात शहर नियोजनात मैलाचा दगड ठरतील, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

दरम्यान, पंतप्रधानांनी इमारतींना आगी लागण्याच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. इमारत कोसळ्याची घटना मोठ्या चिंतेचा विषय आहे. नियमांचे पालन केले, तर अशाप्रकारच्या घटना घडणार नाही, असे ते म्हणाले. राज्यांनी आजही ‘टियर-२’ तसेच ‘टियर-३’ शहरांच्या योजना बनवणे आवश्यक आहे. ही शहरे देखील आर्थिक केंद्रबिंदू होत आहेत.

देशातील स्टार्टअप याच शहरांमध्ये सुरू होत आहेत. या शहरांमधील उद्योग समुहांच्या विकासावर लक्ष देण्याच्या आवश्यकतेवर यावेळी पंतप्रधानांनी भर दिला. भाजपच्या सुशासन सेलच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय महापौर संमेलनात भाजप शासीत महापालिकेतील १२१ महापौर तसेच उप-महापौर सहभागी झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या संमेलनात प्रामुख्याने उपस्थित आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button