Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरास मंजुरी | पुढारी

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरास मंजुरी

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नामांतराचा ठराव आज गुरूवारी विधानसभेत घेण्यात आला. हा ठराव आता केंद्राच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. अखेर नवी मुंबई विमानतळ संर्घष समितीने केलेल्या आंदोलनाला यश आले.

नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी दि.बा. पाटील साहेबांच्या स्मृतिदिनी (२४ जून) सिडकोला घेराव आंदोलन करण्याचा इशारा संर्घष कृती समितीने दिला होता. नामांतराच्या या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांनी १० जून रोजी भव्य साखळी आंदोलन, २४ जूनला ऐतिहासिक सिडको घेराव आंदोलन, ९ ऑगस्ट क्रांतिदिनी मशाल मोर्चा, १७ मार्च भुमिपुत्र परिषद, सिडको वर्धापन दिनाचा काळादिन आंदोलन, २४ जानेवारीचे विमानतळ काम बंद आंदोलन अशी विविध आंदोलने केली होती. पण या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. यामुळे भूमिपूत्रांमध्ये संतापाची लाट पसरली होती.

सिडकोकडे विमानतळाच्या पूर्वीचा नामकरणाचा ठराव स्थगित करून लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा ठराव करावा असे निवेदन दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी त्यावर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे संतापलेल्या भूमीपुत्रांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या ९ व्या स्मृतिदिनी म्हणजे २४ जून २०२२ रोजी सिडको घेराव आंदोलन केले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या नामांतराच्या निर्णयाला विधानसभेची मान्यता मिळाली नव्हती. नव्याने आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने नव्याने निर्णय घेत आज गुरूवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि. बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय निश्चित करत तो विधानसभेत मंजूर झालेला ठराव आता केंद्राकडे पुढील मान्यतेसाठी पाठविण्याचा जाहीर केले.

हेही वाचा

Back to top button