बारामती: ओ, ताई पाणी द्या असा आवाज देत घुरात घुसले आणि दागिन्यांसह रक्कम चोरून गेले

बारामती: ओ, ताई पाणी द्या असा आवाज देत घुरात घुसले आणि दागिन्यांसह रक्कम चोरून गेले

Published on

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील आंबी बुद्रूक येथे महिलेच्या घरात घुसून दोघा चोरट्यांनी तिला धमकावत रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. बुधवार २४ ऑगस्ट रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली. भरदिवसा घरात घुसून लुटण्याच्या या प्रकारामुळे आंबी, मोरगाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात रंजना भाऊसाहेब जगताप (रा. गायरान पाटी, आंबी बुद्रूक, ता. बारामती) या महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेत जगताप यांच्या घरातील ५० हजार रुपयांचे मनीमंगळसूत्र, ५० हजार रुपयांची सोन्याची कर्णफुले, २० हजार रुपयांची अंगठी, १३ हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल असा १ लाख ३३ हजार रुपयांचा माल लंपास करण्यात आला.

बुधवारी फिर्यादी महिलेचे पती शेतात खुरपणीच्या कामासाठी गेले होते. त्या एकट्याच घरी होत्या. घरातील कामे आटोपून त्या बसल्या असताना दुपारी साडे तीनच्या सुमारास दोघा अनोळखी व्यक्तींनी ओ ताई पाणी द्या, असा आवाज दिला. घराच्या सेफ्टी डोअरमधून फिर्यादीने कोण आहे असा आवाज दिला. त्यावर मी आबा आहे, असे सांगण्यात आले. फिर्यादी महिलेला ते नातेवाईक असणारे आबाच आहेत असे वाटल्याने तिने दरवाजा उघडत पाण्याचा तांब्या भरून दिला. त्यावेळी घरासमोर दोघे तरुण दुचाकीवर आले. फिर्यादीला संशय आल्याने ती लागलीच माघारी फिरत सेफ्टी डोअर लावून घेत असतानाच त्यांनी तिला जोराने ढकलून दिले आणि चाकूचा धाक दाखवत अंगावरील व घरातील दागिने, रोख रक्कम काढून देण्यास सांगितले. फिर्यादीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी तू ओरडलीस तर तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. फिर्यादीच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र, कर्णफुले, डाव्या हातातील अंगठी काढून घेतली. त्यानंतर घरात पैसे कुठे आहेत ते आम्हाला काढून दे, अशी मागणी केली. फिर्यादीन घाबरून लोखंडी कपाटाकडे गेली असताना त्यांनी तिला धक्का देत कपाटात ठेवलेले १३ हजार रुपये आणि सोफ्यावरील मोबाईल उचलला. घराचा लोखंडी दरवाजा बाहेरून लावून घेत ते दुचाकीवरून मोरगाव-जेजुरी रस्त्याकडे निघून गेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news