सोलापूर : उद्योजक अभिजित पाटील यांच्या घरासह कार्यालयावर आयकरचे छापे | पुढारी

सोलापूर : उद्योजक अभिजित पाटील यांच्या घरासह कार्यालयावर आयकरचे छापे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पंढरपुरातील उद्योजक तथा साखर कारखानदार अभिजित पाटील यांच्या घरासह कार्यालयावर आयकर विभागाने आज छापे टाकले. तसेच सोलापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहूल कन्सट्रक्शन, आश्‍विनी हॉस्पिटल, कुंभारीतील आश्‍विनी हॉस्पिटल वरही छापे टाकले आहेत. यावरून आयकर विभागाच्या रडारवर सोलापुरातील हॉस्पिटल, डॉक्टर्स व कारखानदार होते हे सिद्ध झाले.

आयकर विभागाने सोलापुरात आज सकाळी छापे टाकण्यास सुरुवात केली. यामध्ये पुणे आयकर विभागाचे सुमारे 48 अधिकारी व कर्मचारी गाड्यांमधून दाखल झाले होते. त्यांच्या कारवर कृषी अभ्यास शिबिर अशा नावाचे पोस्टर्स लावण्यात आली होती. आयकर विभागाने या कारवाया करताना अत्यंत गुप्तता बाळगली. ज्या ठिकाणी छापे टाकायचे होते, त्या प्रत्येक ठिकाणी आयकरचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात जात होते. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहूल कन्सट्रक्शनसह आश्‍विनी हॉस्पिटलमध्ये सेवा देणार्‍या सोलापुरातील विख्यात डॉक्टरांची घरे व त्यांच्या खासगी हॉस्पिटल्सवरही अधिकार्‍यांनी छापे टाकले. डॉक्टरांवर छापे पडल्याने वैद्यकीय क्षेत्रातील अन्य दिग्गजांच्या छातीचे ठोके वाढले आहेत.

पंढरपुरातील वाळू ठेकेदार ते साखर कारखानदार असा प्रवास करणारे तसेच विठ्ठल साखर कारखान्याशी संबंधित असलेल्या अभिजित पाटील यांच्याघरासह कार्यालयांवर व कारखाना पदाधिकार्‍यांवर देखील आयकर विभागाने छापे टाकले. तसेच त्यांच्या उस्मानाबाद येथील साखर कारखान्यातही आयकर विभागाची टीम पोहोचल्याची माहिती मिळत आहे.

येथे पडले छापे

सोलापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहूल कन्सट्रक्शनसह अश्‍विनी हॉस्टिल, कुंभारीतील अश्‍विनी हॉस्पिटल, डॉ. गुरूनाथ परळे यांचे घर व सात रस्त्यावरील त्यांचे खासगी हॉस्पिटल, डॉ. अनुपम शहा यांच्या सोन्या मारुती चौकातील खासगी हॉस्पिटलवर आयकर विभागाने छापे टाकले.

Back to top button