गोवा : भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

गोवा : भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

पणजी; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सोनालींचा स्वीय सचिव सुधीर सांगवान व त्याचा सहकारी सुखविंदर सिंग याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सोनालीचा भाऊ रिंकू ढाकाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि 23) पहाटे सोनालीचा मृत्यू झाला होता.

सोनाली फोगाट यांच्या मृत्यूच्या दोन दिवसांनंतर तिच्या कुटुंबीयांनी आज तिच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन किंवा फॉरेन्सिक तपासणीसाठी संमती दिली. कुटुंबीयांच्या मान्यतेनंतर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल गुरुवारी सायंकाळी सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शवविच्छेदनासाठी दोन सदस्यीय फॉरेन्सिक तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. तसेच रुग्णालयातील संपूर्ण शवविच्छेन प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी भादंवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सोनालींच्या भावाने केला खुनाचा दावा

सोनाली फोगाट तिच्या मृत्यूपूर्वी तिची आई, बहीण आणि भावाशी बोलली होती, असा दावा तिचा भाऊ रिंकू ढाकाने केला आहे. ती अस्वस्थ होती. तिने तिच्या सहकार्‍यांबद्दल तक्रार केली होती. तिच्या मृत्यूनंतर हरियाणातील फार्महाऊसमधील सीसीटीव्ही कॅमेरे, लॅपटॉप आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी गायब झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी सोनालीच्या कुटुंबियांनी केली असुन तिचा खून केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पोलिसांना तपासाचे स्वातंत्र्य : मुख्यमंत्री

सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची गोवा पोलिस गंभीरपणे तपास करत आहेत. गोव्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) जसपाल सिंग हे या प्रकरणी खास लक्ष ठेऊन आहेत. पोलिसांना चौकशीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या चौकशीत सरकारचे कुठलेही दडपण पोलिसावर नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

Back to top button