MNS Meeting : मनसेचा मुंबईतील संवाद मेळावा रद्द | पुढारी

MNS Meeting : मनसेचा मुंबईतील संवाद मेळावा रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बुधवारी (दि.१३) रंगशारदा येथे कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळावा (MNS Meeting) होणार होता; परंतु मुंबईत सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे हा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाचा अंदाज घेऊन मेळाव्याची पुढील तारीख लवकरच कळवली जाईल, असे राज ठाकरे यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

या पत्रामध्ये म्हटले आहे की, आपण उद्या एक मेळावा (MNS Meeting) आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या; परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाने थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो. तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे.अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन, तुम्हा सर्वांना कळवली जाईलच.

दरम्यान, तुम्ही स्वतःची तर काळजी घ्याच, परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे. तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यतः नदीकाठाला जिथे लोक राहत आहेत. तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली – कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुध्द पाणी, अंथरूण-पांघरूण (सर्वत्र ओल असते) पुरवावं लागेल. मुख्यतः वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडे उन्मळून पडत आहेत. ती नंतर पुन्हा लावावी लागतील. अशा खूप गोष्टी आहेत.

एक लक्षात घ्या की, अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात. त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल, असं काहीही करू नका. अर्थात, असं काही होऊ नये, कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे. फक्त सतर्कतेसाठी सांगितलं, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button