कोलकाता सहल रद्द अन् सेनेचा एकेक आमदार निसटला | पुढारी

कोलकाता सहल रद्द अन् सेनेचा एकेक आमदार निसटला

मुंबई: पुढारी वृत्तसेवा एकनाथ शिंदे जेव्हा सुरतकडे निघाले तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे केवळ 14 आमदार होते, तर लोअर परेल येथील सेंट रेगिस हॉटेलमध्ये शिवसेनेच्या ताब्यात 31 आमदार होते. त्यांना कोलकाता येथे घेऊन जाण्याची योजना होती, मात्र याचा आर्थिक भार कोणी उचलायचा, असा प्रश्न निर्माण झाला. जर या 31 आमदारांना कोलकाता येथे नेले असते तर फसले असते, अशी माहिती आता शिवसेनेच्या नेत्याकडून उघड केली जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदान संपल्यावर एकनाथ शिंदे हे 14 आमदारांना घेऊन सुरतकडे निघाले. ही बातमी उद्धव ठाकरे यांना कळल्यावर अनेक आमदार वर्षा बंगल्यावर पोहोचले. तेथून हे या आमदारांना लोअर परेल येथील सेंट रेगिस हॉटेलमध्ये आणण्यात आले. वरूण सरदेसाई, सचिन अहिर, सुनील राऊत यांच्यासह युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा पहारा या आमदारांवर होता. मुंबईत हे आमदार सुरक्षित नाहीत, त्यामुळे त्यांना कोलकाता येथे घेऊन जाण्याची योजना होती. पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी यांची सत्ता आहे, त्यामुळे तेथून आमदारांना पळविणे सोपे नव्हते,पण तेथे आमदारांना घेऊन जाण्याचा खर्च कोण करणार,असा विषय आला तेव्हा कोणी पुढे आले नाही. अखेर कोलकाता येथे घेऊन जाण्याची योजना बारगळली.

त्यानंतर शिवसेनेचा एक एक आमदार हॉटेलमधून पसार होऊ लागला होता. कोणी कुटुंबातील आजारी असल्याची कारणे दिली, तर कोणी आपण बंडखोरी करणार नाही, अशा आणाभाका खात मतदारसंघात जातो असे सांगत सुरत गाठली. शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि सत्ता असताना कोलकत्ता येथे आमदारांना घेऊन जाण्याची व्यवस्था होऊ शकत नाही, असा प्रश्न शिवसेनेच्या पदाधिकार्‍याने केला.

मुंबई मुक्‍कामी असलेले हे आमदार शिंदे गटाकडे गेले नसते तर त्यांचे बंड शिवसेनेला रोखता आले असते. पण या 31 आमदारांची समजूत काढण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले नाहीत. तसेच शिवसेनेचा कोणताही नेता पुढे आला नाही, अशी कुजबूज शिवसेनेत आहे.

  • सेंट रेगिस हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना मुक्कामी ठेवले त्या हॉटेलचे बिल कोणी भरायचे, असा विषय आला तेव्हा नेत्यांनी हात वर केले. शेवटी नगरसेवकांकडून वर्गणी घेऊन हे बिल अदा केले, अशी चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात आहे.
  • कोकणातील शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या पलायनाची कहाणी अचंबित करणारी आहे. हे मंत्री उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक समजले जात. शिंदे यांच्या बंडानंतर हे मंत्री मातोश्रीवर गेले. त्यांना वरच्या मजल्यावर थेट एन्ट्री होती. त्यांनी तेथे आदित्य ठाकरे यांच्यासोबत नाष्ता केला. त्यानंतर ते मंत्री कोकणात गेले आणि कोकणातून पुन्हा मुंबईत येऊन थेट गुवाहाटी गाठली.

हेही वाचा

Back to top button