पौड : पुढारी वृत्तसेवा: वातुंडे (ता. मुळशी) येथील लक्ष्मी शिंदे आणि बाळकृष्ण शिंदे या दाम्पत्याने 20 गुंठे क्षेत्रात भात रोपांची अनोखी हिरवीगार 120 फूट लांब विठ्ठल माऊली साकारली आहे. आषाढी एकादशीनिमित्त भात रोपांतून साकारलेले हे विठ्ठलाचे रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असून शिंदे दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बाळकृष्ण शिंदे यांनी आपल्या 20 गुंठे शेतात विठ्ठल शोधला. शेतात 120 फूट लांब आणि 60 फूट रुंदीचे पांडुरंग रूपी भात पीक उगवून आणले आहे. भातरोपांतून विठ्ठल साकारण्यासाठी त्यांनी महिन्यापूर्वी शेतात बियाणे टाकून दाढ केली.
भाताच्या दाढी विठ्ठलरूपी फक्कीने काढलेल्या डिझाईनमध्ये तंतोतंत पेरल्या. पाऊस होताच आता हा पेरलेला विठ्ठल लक्षवेधी ठरला आहे. सिव्हिल इंजिनिअर असलेल्या बाळकृष्ण शिंदे यांनी सुरुवातीला अॅटोकॅडमध्ये डिझाईन तयार केले. ते जमिनीवर रेखाटून त्यावर फक्की टाकली. त्यामध्ये भात रोपांची विठ्ठलरूपी पेरणी केली. आता पाऊस होताच या हिरव्यागार विठ्ठलाचे दर्शन होत आहे. भक्तीमय शेतीच्या या मुळशी पॅटर्नची चर्चा सर्वत्र होत आहे.