पुढारी ऑनलाईन: मविआ सरकारच्या काळात आरेचा ८०० एक्कर भाग हा जंगल म्हणून घोषित करण्यात आला होता. परंतु आजच्या पुन्हा शिंदे फडणविस सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचे सरकार हे मुंबईच्या जीवावर उठल्याचा आरोप करत, शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला. मुंबईतील आरे कारशेडविरोधी पर्यावरणवाद्यांनी आज विठुरायाला साखडे घालत 'आरे वाचव' आंदोलन केले. यामध्ये आदित्य ठाकरे यांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, मविआ ने पर्यावरणाला जास्त महत्त्व दिले. आम्ही आमच्या सरकारमध्ये आदिवासींच्या हक्कावर गदा आणली नाही. मविआ हे मुंबईची काळजी घेणारं सरकार होते. झाडे, वन्यजीव वाचवणे ही काळाची गरज आहे म्हणून आम्ही कारशेडसाठी पर्यायी जागेचा विचार केला होता. पण सध्याचे सरकार हे मुंबईविरोधी आहे. त्यामुळे त्यांनी आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्याच्या सरकारने मविआच्या चांगल्या प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. पण यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचे नुकसान आहे. शिवसेना आणि शिंदेंच्या विधिमंडळाच्या ५२ आमदारांना विधिमंडळ सचिवांनी नोटीसा पाठवण्याच आल्या आहेत,पण यामध्ये आदित्य ठाकरेचे नाव नाही, यावर बोलताना माझ्यावर खास प्रेम करण्याची गरज नसल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.