शिंदे गटाच्या चालीने अडखळले मनसेचे इंजिन! | पुढारी

शिंदे गटाच्या चालीने अडखळले मनसेचे इंजिन!

मुंबई : गौरीशंकर घाळे राज्यातील सत्तांतराने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असतानाच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय गणितेही बिघडल्याचे चित्र आहे. आवश्यकतेनुसार जवळीक साधणार्‍या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या राजकारणात मात्र मनसेला सोबत घेण्याचे आधीच टाळले आहे. त्यावर आमचे काम ‘एकटा जीव सदाशिव’ पद्धतीचे असल्याचे मनसे नेतेच सांगत. मात्र, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यातील नव्या समीकरणांनी मनसेला याच वाटेवर चालावे लागणार की युती-आघाडीचा टेकू मिळणार, याबाबत साशंकता आहे.

मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘लाव रे तो व्हिडीओ’चा प्रयोग करत मनसेने त्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विशेषतः राष्ट्रवादी आणि मनसेची जवळीक वाढली. पण, प्रत्यक्ष निवडणुकीत मनसेपासून योग्य अंतर राखण्याची खेळी शरद पवार यांनी खेळली होती. त्यानंतर मनसेने अचानक भगवा अवतार धारण करत भाजपशी सूत जमवले. राज्यातील ताज्या सत्तांतरापूर्वी राज्यात मशिदींवरील भोंग्यावरून मनसेने राजकीय वातावरण तापविले आणि या आक्रमक भूमिकेने शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यामुळे भाजप आणि मनसेची मिलीभगत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलारांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरीपर्यंत भाजप नेत्यांचे राज ठाकरेंकडील पाहुणचार वाढल्याने भाजप-मनसे युतीच्या चर्चांना बळकटी मिळाली होती. मात्र, भाजप नेत्यांनी मनसेचा परप्रांतीय मुद्दा अडसर असल्याचे सांगत युतीची शक्यता फेटाळली. आता एकनाथ शिंदेसह 40 आमदार सोबत आले आणि सत्ताही मिळाली. परिणामी, आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गटासारखा कट्टर हिंदुत्ववादी साथीदार मिळाल्याने शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी भाजपला मनसेची गरज उरलेली नाही.

राष्ट्रवादीसोबतचे संबंध संपुष्टात आले, भाजपलाही गरज उरलेली नाही आणि शिवसेनेशी तर उभा दावा, अशा परिस्थितीत मनसेला आपले इंजिन एकट्यानेच चालवावे लागणार, अशी एकूण राजकीय परिस्थिती आहे. तूर्त मनसेचे नेते शिवसेनेने केलेल्या अपमानाची परतफेड करण्यात गुंतले आहेत. मनसेला संपलेला पक्ष म्हणून हिणवणारे आदित्य ठाकरे आज पक्ष नसलेला माणूस झाले आणि चिन्हदेखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये, असे सांगत ‘शिल्लक सेना’ अशी बोचरी टीका अमेय खोपकर यांनी केली. मात्र, मनसेच्या या शिवसेना विरोधाचा फायदा मनसेला कमी आणि भाजपला व आता शिंदे गटाला अधिक होणार असल्याने नवी व्यूहरचना आखण्याचे आव्हान मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या समोर उभे ठाकले आहे.

हेही वाचा

Back to top button