रेल्वेच्या 756 प्रमुख स्थानकांवर लागणार व्हिडीओ प्रणाली | पुढारी

रेल्वेच्या 756 प्रमुख स्थानकांवर लागणार व्हिडीओ प्रणाली

मुंबई : पुढारी वृत्तसेवा भारतीय रेल्वे आणि रेलटेलने महिला, मुले आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी देशातील महत्वाच्या 756 रेल्वे स्थानकावर आयपी आधारित सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी एका खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. मध्य रेल्वेवरील 115 तर पश्चिम रेल्वेवरील 49 स्थानकांवर ही प्रणाली राबविण्यात येणार आहे. जानेवारी 2023 पर्यंत यास्थानकांवर ही आधुनिक प्रणाली कार्यान्वित होणार आहे. निर्भया फंडाअंतर्गत ही प्रणाली राबविण्यात येत आहे.

मेल-एक्सप्रेस, लोकलच्या गर्दीत प्रवाशांच्या वस्तू चोरल्या जातात. अनेकदा चोरीच्या उद्देशाने प्रवाशावर हल्ला होतो. चोराचा शोध घेताना रेल्वे पोलिसांना मेहनत घ्यावी लागते. तसेच स्थानकात बेपत्ता झालेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांचा फोटो पोलिसांना दाखवून स्थानकात उद्घोषणा करून शोध घेतला जातो. यावर उपाय म्हणून रेल्वेने स्थानकात आधुनिक, चेहर्‍याची ओळख पटवणारे कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेलटेलने हे कॅमेरे बसविण्यासाठी एका खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे.

देशातील ए 1, ए, बी आणि सी श्रेणीतील रेल्वे स्थानक, प्रिमियम ट्रेन आणि उपनगरीय लोकलचे कोच कव्हर करण्यासाठी देशातील 5 हजार स्थानकांवर रेलटेलतर्फे सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. या सीसीटीव्हींना ऑप्टिकल फायबर केबलवर चालविले जाते. संशयित आरोपी, गुन्हेगार, हरवलेल्या वक्ती, तिकीट दलाल यांचे छायाचित्र या यंत्रणेत समाविष्ट केले जाते. संबंधित व्यक्ती कॅमेर्‍याच्या कक्षेत येताच त्याची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला मिळते. त्यामुळे ही व्यक्ती स्थानकात नेमकी कुठे आहे याची माहिती मिळताच त्याचा मागोवा घेण्यात येतो. ही यंत्रणा 24 तास कार्यरत असते. या कॅमेरा आणि व्हिडीओ फिडची 3 स्तरांवर निगराणी केली जाते. तसेच या सीसीटीव्हीमध्ये 30 दिवस चित्रीकरण राहणार आहे.

हेही वाचा

Back to top button