वर्षाचे उद्दिष्ट केले तीनच महिन्यांत पूर्ण | पुढारी

वर्षाचे उद्दिष्ट केले तीनच महिन्यांत पूर्ण

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने दंडात्मक कारवाईचा धमाका केला. गत तीन महिन्यांत 3 लाखांचा दंड वसूल केला. केवळ तीन महिन्यांतच या विभागाने वार्षिक उद्दिष्टपेक्षाही अधिक दंड वसूल करण्याची किमया साधली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक पथकाच्या वतीने सोलापूर शहरात रहदारीस अडथळा करणारे अतिक्रमण यावर कारवाई करण्यात येते. रस्त्यांवर राहणारी, अडथळा ठरणारी खोकी, फेरीवाले चारचाकी गाड्या व इतर साहित्य जप्त करून दंडात्मक कारवाई या विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या विभागाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे 3 लाख रुपये दंड आकारला आहे. गत काही महिने या विभागाकडील पोलिस बंदोबस्त पोलिस आयुक्तालयाने काढून घेतला होता.

मात्र 6 मे रोजी 6 पोलिसांचा बंदोबस्त मिळाल्यानंतर या विभागाने अधिक गतीने कारवाई सुरू केली, अशी माहिती या विभागाचे प्रमुख अ‍ॅड. अरुण सोनटक्के यांनी दिली. महापालिकेच्या 2022-23 या अर्थसंकल्पात अतिक्रमण प्रतिबंधक विभागास 2 लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट या विभागाने केवळ एप्रिल ते जून या तीनच महिन्यांत पूर्ण करत सुमारे 3 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, सन 2018-19 मध्ये 4.80 लाख रुपये दंडापोटी जमा झाले होते. 2019-20 मध्ये 3.25 लाख रुपये, 2020 -21 मध्ये 1.48 लाख, 2021-22 मध्ये 1.05 लाख दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

असे आहेत दंडाचे नवीन दर

महापालिकेने 26 एप्रिलपासून लागू केलेल्या दंडाच्या नव्या दरानुसार लोखंडी खोक्याला 8 हजार रुपये, लाकडी खोक्यास 6 हजार रुपये, चारचाकी हातगाडीला 4 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. लोखंडी टेबल-खुर्ची, बाकडे, इतर सामान यासाठी प्रत्येकी 1 हजार रुपये दंड आहे. लाकडी टेबल तीनशे रुपये प्रति नग याप्रमाणे दंड आकारण्यात येत आहे.

Back to top button