Shivani Surve : लग्नानंतर शिवानी सुर्वेचं थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतून पुनरागमन | पुढारी

Shivani Surve : लग्नानंतर शिवानी सुर्वेचं थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतून पुनरागमन

पुढारी ऑनलाईन डेस्क : देवयानी मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Shivani Surve) स्टार प्रवाहची नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं मधून शिवानी तब्बल ९ वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत ती मानसी सणस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. (Shivani Surve)

अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचं साम्राज्य उभं केलं. आपल्या मुलीनेही खूप शिकून नाव कमवावं असं त्यांना वाटतं. वडिलांचं स्वप्न मानसीला पूर्ण करायचं आहे. आपल्या कॉलेजची टॉपर गायत्री मॅडमच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित आहे. पण आपल्या समोर कुणालाही जिंकू न देणाऱ्या गायत्रीच्या स्वार्थी स्वभावाची तिला कल्पना नाही. खरी ठिणगी तेव्हा पडते जेव्हा मानसी पदवी परrक्षेत टॉप करत गायत्रीचा रेकॉर्ड मोडते. मानसीला नाती जोडून ठेवायला आवडतात. कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालत नाही. नातं परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असावं असं तिला वाटतं.

तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे फारच उत्सुक आहे. ‘स्टार प्रवाह कुटुंबासोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांचे विषय, त्याची मांडणी मला खूपच भावते. त्यामुळेच थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेसाठी मी लगेच होकार दिला. मानसी हे पात्र मला अतिशय आवडलं. देवयानी मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. हेच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे.’ अश्या शब्दात शिवानीने आपली भावना व्यक्त केली.

मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं १७ जूनपासून रात्री ९ वाजता पाहता येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

Back to top button