नगर : ‘माता सुरक्षा’त झेडपीची घोडदौड, जिल्हा रुग्णालयाची पिछेहाट, | पुढारी

नगर : ‘माता सुरक्षा’त झेडपीची घोडदौड, जिल्हा रुग्णालयाची पिछेहाट,

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शासनाने 26 सप्टेंबरपासून हाती घेतलेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाला जिल्हा परिषदेच्या तुलनेत जिल्हा रुग्णालय आणि मनपा आरोग्य यंत्रणेच्या शहरी भागात मोठी मरगळ आल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेतून 18 वर्षांवरील 8 लाख 58 हजार 415 (59 टक्के), जिल्हा रुग्णालयाच्या शहरी नगरपालिका, नगरपरिषद परिसरात 31 हजार 630 (12 टक्के), आणि महापालिका क्षेत्रात 53,651 (30 टक्के) अशी एकूण 9 लाख 43 हजार 696 मातांची तपासणी करण्यात आली आहे. तर अजूनही 9 लाख महिला व मातांपर्यंत यंत्रणा पोहचू शकलेली नाही.

घरातील स्त्री आपल्या कुटुंबासाठी नेहमीच वेेगवेगळ्या भूमिका करत असते. मात्र, हे करत असताना तिचे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. त्याचे परिणाम कुटुंबावर दिसून येतात. त्यामुळे घरातील माता सुरक्षित असेल, तर कुटुंब सुरक्षित राहील, या भावनेतून सरकारने दि. 26 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत विशेष अभियान हाती घेतले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना हे अभियान राबविण्याच्या सूचना आहेत. हा कालावधी संपला असला तरी हे अभियान सुरूच राहणार आहे.

कोणकोणत्या तपासण्या केल्या जातात!
18 वर्षावरील महिला मातांची उंची, वजन, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण आवश्यकता वाटल्यास रक्ताच्या चाचण्या, छातीचे एक्सरे, इत्यादी चाचण्या केल्या जात आहेत. माता आणि बालकांचे लसीकरण केलेले आहे का? याचीही माहिती या मोहिमेत घेतली जात आहे.

25 ग्रामीण रुग्णालयात तपासणीचा वेग कमीच!
जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत 5 नगरपालिका येतात. या अंतर्गत असलेल्या 25 ग्रामीण रुग्णालयात महिला व मातांचीही तपासणी केली जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनात हे अभियान राबविले जात आहे. मात्र, ग्रामीण रुग्णालयात फिल्डवरील यंत्रणा नसल्याने शहरी भागात या योजनेला मरगळ आली आहे.

96 आरोग्य केंद्र, उपकेंद्राची दखलपात्र कामगिरी
जिल्हा परिषदेच्या 96 आरोग्य केंद्र आणि 555 उपकेंद्रांच्या माध्यमातून महिला मातांची तपासणी केली जात आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर अशी फौजच या कामी मैदानात असल्याने 60 टक्के तपासणी पूर्ण झाली आहे. अर्थात हा वेग अजून वाढविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे हे स्वतः प्रयत्नशील आहेत.

प्रचार व प्रसिद्धीतून तपासणीचा टक्का वाढेल!
शासनाने माता सुरक्षा अभियानासाठी दोन कोटींना मंजूरी दिली आहे. ही रक्कम आल्यानंतर यातून प्रचार व प्रसिद्धीसह अन्य उपक्रमातून एकही महिला तपासणीपासून आणि उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना प्रयत्नशील राहावे लागणार आहे.

 

रुग्णालयाची पिछेहाट जिल्हा रुग्णालय आणि 25 ग्रामीण रुग्णालयात महिला व मातांची तपासणी केली जात आहे. महिला व मातांनी स्वयंस्फूर्तीने तपासणीसाठी यावे, याकरीता आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत आहोत. लवकरात लवकर उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील.
                                                 -डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक

 

सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून माता व महिलांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी सर्वच परिश्रम घेत आहे. तपासणीचा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रचार आणि प्रसिद्धीवरही आम्ही जोर देणार आहोत.
                                           डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

Back to top button