‘क्रिस्टल टॉवर’च्या छतावरच शिजला हल्ल्याचा कट | पुढारी

‘क्रिस्टल टॉवर’च्या छतावरच शिजला हल्ल्याचा कट

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या राहत्या इमारतीच्या टेरेसवर पाच ते सहा महिने बैठका सुरू होत्या, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्या ठिकाणीच 7 एप्रिलच्या बैठकीत हल्ल्याचा कट आखण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानावर 8 एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एसटी आंदोलकांनी हल्ला केला होता. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह एकूण 117 आरोपींना अटक केली आहे. सदावर्ते सध्या सातारा पोलिसांच्या कोठडीत आहेत. दरम्यान, गावदेवी पोलिसांनी सदावर्तेंचे वास्तव्य असलेली ‘क्रिस्टल टॉवर’ इमारत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. त्यातूनच या इमारतीच्या टेरेसवर गेल्या पाच-सहा महिन्यांत झालेल्या बैठकांबाबतची माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदावर्ते गेल्या 5 महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी दुखावलेले एसटी कर्मचारी 50 पेक्षा जास्त जणांच्या गटाने त्यांच्याकडे जात होते. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आपल्या समस्या घेऊन ते सदावर्ते यांना भेटण्यासाठी येत होते. ‘क्रिस्टल टॉवर’च्या छतावरच सदावर्ते त्यांच्या बैठका घेत असल्याचे तपासात निष्पन्न झालेे. त्यामुळे पोलिसांनी या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून ताब्यात घेतले आहे.

सदावर्ते यांचे घर असलेल्या या इमारतीमध्ये सर्वांत अधिक कोणाचे येण-जाणेे होते आणि नियमित भेटींमागे कोणती कारणे होती, याचा तपास पोलीस करत आहेत. ‘सिल्व्हर ओक’वरील हल्ल्याबाबतची बैठक 7 एप्रिलला झाल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि काही जणांना अटकसुद्धा केली आहे. अटकेत असलेल्या संशयितांकडून त्या बैठकीत झालेली चर्चा आणि निर्णयाबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

सदावर्तेंवर बारामतीत बक्षिसे

‘सिल्व्हर ओक’वरील हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी बारामतीत निषेध रॅली झाली. अ‍ॅड. सदावर्तेंची जीभ हासडणार्‍याला 11 लाख, तर बांगड्या भरणार्‍या महिला कर्मचार्‍यांना पाच लाखांचे बक्षीस कामगार नेते तुकाराम चौधर यांनी जाहीर केले. जी व्यक्ती पगारवाढीला न्यायालयात जाऊन विरोध करते; ती कामगारांना काय न्याय मिळवून देईल, असा सवाल नानासाहेब थोरात यांनी केला.

Back to top button