ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचे निधन | पुढारी

ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचे निधन

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन: मराठीतील  संपादक, अनुवादक कवी सतीश काळसेकर यांचे पेण येथे आज सकाळी निधन झाले. महानगरीय जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगात येणारे उत्कट भावनात्मक अनुभव कवितेच्या केंद्रस्थानी ठेवणारे कवी सतीश काळसेकर डाव्या चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते होते.

अधिक वाचा

त्यांच्या ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या गद्यलेखनाला साहित्य अकादमी पुरस्काराने गौराविले होते. काळसेकर हे चांगले वाचक होते.

ग्रंथसंग्रह इतका अफाट होता की, त्यांनी त्यासाठी पेणला आपला मुक्काम हलवून तेथे त्यासाठी घर बांधले.

गेली कित्येक वर्षे ते लोकवाङमय गृहाचे वाङमय वृत्त हे नियतकालिक संपादित करत होते.

काळसे (ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग) येथून शालेय शिक्षणाची सुरुवात झाली.

मुंबई येथून बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ मासिक ज्ञानदूत व टाइम्स ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. यानंतर ते १९६५ ते २००१ पर्यंत बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करत होते.

अधिक वाचा

१९७१ मध्ये पहिला काव्यसंग्रह

त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९७१ मध्ये ‘इंद्रियोपनिषद्’ प्रकाशित झाला. त्यानंतर ‘साक्षात’ (१९८२),‘ विलंबित’ (१९९७) हे कवितासंग्रह तसेच ‘कविता: लेनिनसाठी’ (१९७७, लेनिनवरच्या विश्वातील कविता-अनुवाद व संपादन),

‘नव्या वसाहतीत’ २०११, अरुण कमल यांच्या हिंदी कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद) हे अनुवाद प्रकाशित झाले आहेत.

‘वाचणऱ्याची रोजनिशी’ (२०१०), ‘पायपीट’ (२०१५) हे त्यांचे गद्यलेखन प्रकाशित आहे.

‘मी भयंकराच्या दारात उभा आहे’ (नामदेव ढसाळ यांची कविता, संपादन – प्रज्ञा दया पवारसह, २००७), ‘आयदान: सांस्कृतिक ठेवा’
( संपादन- सिसिलिया कार्व्हालोसह, २००७),

‘निवडक अबकडइ’ (संपादन- अरुण शेवतेसह, २०१२) ही त्यांनी केलेली संपादने प्रकाशित आहेत.

अधिक वाचा

त्यांच्या कवितांचा समावेश अनेक महत्त्वाच्या संकलनात झाला आहे.

उत्तम अनुवादक

हिंदी, बंगाली, मल्याळम, इंग्रजी, पंजाबी यासह अन्य भारतीय भाषांत त्यांच्या कवितांचे अनुवाद झाले आहेत. त्यांनी देशी-विदेशी भाषांतील अनेक महत्त्वाच्या कवींच्या कवितांचे मराठी अनुवाद केलेले आहेत.

महाश्वेता देवी आणि रस्किन बाँण्ड यांच्या कथांचे मराठी अनुवाद केले. ‘अत्त दीप भव’ (वृत्तमानस), ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ (आपले वाङ्‌मय वृत्त) हे त्यांचे सदर लेखन प्रकाशित आहे.

प्रवास लेखन, सांस्कृतिक चळवळी, खाद्यजीवन या सारख्या विषयांवर त्यांनी वेळोवेळी केलेले लेखन नियतकालिकांतून, वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे. लघुनियतकालिकांच्या चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

नवसाहित्याची सुरुवात करणाऱ्या या चळवळीतील ते अग्रणी कार्यकर्ते होते. काळसेकर यांनी मागोवा, तात्पर्य, लोकवाङ्‌मय, फक्त, तापसी, चक्रवर्ती आणि आपले वाङ्‌मय वृत्त इत्यादी नियतकालिकांची संपादकीय जबाबदारी सांभाळली.

मराठी प्रकाशनाच्या क्षेत्रातील लोकवाङ्‌मय गृह, मुंबई या प्रकाशन संस्थेच्या संपादनाचे कार्य त्यांनी केले आहे. याशिवाय अभिनव प्रकाशन या प्रकाशन संस्थेतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

अधिक वाचा

महानगरीय जीवन हाच कवितेचा गाभा

महानगरीय जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगात येणारे उत्कट भावनात्मक अनुभव हा काळसेकर यांच्या कवितेचा गाभा आहे.

त्यांच्या कवितेतील माणूस हा महानगरातील कनिष्ठ मध्यमवर्गातून आलेला चाकरमानी असून, तो स्वतःची तीव्र संवेदनशीलता जपत कवितेतून व्यक्त होतो.

सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातील संघर्ष, अनिश्चितता, सुख दुःखे, सोशिकपणा हे त्यांच्या कवितेचे विषय आहेत.

काळसेकर यांची कविता मराठीच्या मध्यवर्ती प्रवाहातील अतिशय महत्त्वाची कविता आहे.

डाव्या चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते

काळसेकर मार्क्सवादी विचारसरणीच्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते.

डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे सदस्य होते.

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे उभारण्यात आलेल्या वेगवेगळ्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला.

समांतर लेखक संघात ते कार्यशील होते. अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाचे ते महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचे अध्यक्ष होते तसेच आजही ते या संघटनेत कार्यरत आहेत.

अधिक वाचा:

विविध पुरस्कारांनी सन्मान

काळसेकर यांना वाङ्‌मयीन कार्यासाठी सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिक (१९७७), लालजी पेंडसे पुरस्कार (१९९७),

बहिणाबाई पुरस्कारः कवी (१९९८), कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद (१९९८), महाराष्ट्र शासन पुरस्कार (१९९९), कैफी आझमी पुरस्कार (२००६), महाराष्ट्र शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार (२०१०-२०११),

सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेतर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार (२०१३ ), साहित्य अकादमी पुरस्कार (२०१३), महाराष्ट्र फाऊंडेशन ग्रंथ पुरस्कार (२०१८) त्यांना मिळाले आहेत.

हेही वाचलेत का: 

पाहा व्‍हिडिओ : कोल्हापूर शहर महापुराच्या विळख्यात 

Back to top button