कोल्हापूर महापूर : अत्यावश्यक सेवांकरिताच पेट्रोल-डिझेल मिळणार | पुढारी

कोल्हापूर महापूर : अत्यावश्यक सेवांकरिताच पेट्रोल-डिझेल मिळणार

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन : जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलची टंचाई होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महापूर परिस्थिती चिघळत चालल्यामुळे मुख्य महामार्ग बंद झाल्यास किंवा अंतर्गत रस्ते बंद झाल्यास पेट्रोल-डिझेलची टंचाई येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत संबंधित कंपन्यांच्या सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा शिल्लक ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकार्यालयातून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत पेट्रोल व डिझेल हे केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच वितरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पोलिस वाहने, आरोग्य विभागाची वाहने, ॲब्युलन्स, वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींची शासकीय-खासगी वाहने,  महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था यांची वाहने, कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची खासगी वाहने (शासकीय ओळखपत्र पाहून) ज्या स्वयंसेवी संस्था पूर परिस्थितीत काम करत आहेत.

या सर्वांची वाहने (त्यांच्या लेटरहेडवरील तसे पत्र पाहून) एनडीआरएफ, एसडीआरएफ, व्हाईट आर्मी, विमानतळ प्राधिकरणाची वाहने मदतकार्य करणारी वाहने या वाहनांना पेट्रोल आणि डिझेल वितरीत करण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी कार्यालयातून काढलेल्या परिपत्रात म्हंटलं आहे.

या आदेशाचा भंग करणारी कोणतीही व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. कोल्हापूर महापूर परिस्थितीत महामार्ग बंद होण्याच्या शक्यतेवर हे परिपत्रक काढण्यात आले आहे.

पहा व्हिडीओ : १६ वर्षांनंतर कोल्हापुरातील रंकाळा तलावर ओव्हरफ्लो…

Back to top button