कोल्हापूर पूर : कोणत्याच धरणाचे दरवाजे उघडले नाही तरी महापूर कसा?

कोल्हापूर पूर : कोणत्याच धरणाचे दरवाजे उघडले नाही तरी महापूर कसा?

Published on

कोल्हापूर जिल्‍ह्यातील एकाही धरणातून पाण्‍याचा विसर्ग सुरु नाही, तरीही कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला महापुराने अवघ्या दोन दिवसांत महाविळखा घातला आहे. केवळ दोन दिवसांत उद्भवलेल्या अरिष्टामुळे कोल्हापूरकर पुरते चक्रावून गेले आहेत. याबाबत पाटबंधारे विभागातील अधिकार्‍यांनी केलेली कारणमीमांसा खूप बोलकी आहे. केवळ नदी खोर्‍यांसह 'फ्री कॅचमेंट' एरियात होत असलेल्‍या तुफान कोसळधारेमुळे महापुराचे संकट निर्माण झाले आहे.

गेले चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या संततधारेमुळे शहरासह जिल्‍ह्यातील पूरस्‍थिती अत्‍यंत बिकट बनली आहे. शुक्रवारी राधानगरी, काळमावाडी या प्रमुख धरणांसह एकाही धरणातून पाण्‍याचा विसर्ग सुरू नव्‍हता. तरीही पंचगंगा नदीची पाणी पातळी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता ५४ फूट ४ इंच इतकी झाली. राजापूर बंधार्‍यारून ७० हजार क्‍युसेक्‍स पाण्‍याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्‍ह्यात पंचगंगा खोरे (राधानगरी, तुळशी, कुंभी, कासारी आणि धामणी), दूधगंगा, वारणा या खोर्‍यांत 'फ्री कॅचमेंट' एरियात प्रत्येकी दररोज सरासरी 300 मि.मी. पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरण शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत ९० टक्‍के भरले होते. जिल्‍ह्यातील धरणांतून केवळ वीजनिर्मितीसाठी पाण्‍याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणातून १४३० क्‍युसेक्‍स, तुळशी ४००० क्‍युसेक्‍स, कुंभी 1,200 आणि कासारी धरणातून २५० क्‍युसेक्‍स असा एकूण केवळ ४५०० क्‍युसेक्‍स पाण्‍याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, 'फ्री कॅचमेंट' एरियात सुरू असणार्‍या तुफानी पावसाने पंचगंगेसह सर्वच नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्याला महापुराचा विळखा पडला आहे.

राधानगरी तुळशी, वारणा दूधगंगा, कडवी, कुंभी, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ, कोदे या सर्व धरणांत पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गतवर्षीच्‍या तुलनेत यंदा १० ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. धरणे पूर्ण भरली नसतानाही शहरास महापुराचा विळखा पडला आहे. 'फ्री कॅचमेंट' एरियातील पाऊस थांबत नसल्?याने पंचगंगा नदीची पातळी सातत्‍याने वाढतच आहे. बहुतांश धरणे भरण्‍याच्‍या मार्गावर असताना महापुराची स्थिती गंभीर आहे. धरणाचे दरवाजे उघडल्यास पाण्‍याचा विसर्ग सुरू होऊन परिस्थिती आणखी बिघडण्‍याची शक्‍यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news