कोल्हापूर महापूर : NDRF चे पथक चिखली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना | पुढारी

कोल्हापूर महापूर : NDRF चे पथक चिखली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात महापूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पूर स्थिती गंभीर होत चालली आहे. महापुराचाचा वेढा असणाऱ्या प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल येथून एनडीआरएफची तिसरी टीम रवाना झाली.

यावेळी आमदार पी.एन.पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे-भामरे तसेच एनडीआरएफचे जवान उपस्थित होते.

पूरग्रस्त प्रयाग चिखली, आंबेवाडी भागातील बहुतांशी नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. उर्वरित सर्व नागरिकांचे सुरक्षित स्थळी युद्धपातळीवर स्थलांतर करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील प्रयत्नशील आहेत.

शहर व ग्रामीण भागातील पूरग्रस्तांचे प्रशासनाच्या वतीने स्थलांतर करण्यात येत आहे. शहरात देखील काही भागात पुराचे पाणी वाढत आहे. अशा वेळी पालकमंत्री सतेज पाटील नागरिकांच्या स्थलांतर व मदतकार्यात सहभागी झाले आहेत. महावीर कॉलेज जवळील डायमंड हॉस्पिटल तसेच खानविलकर पेट्रोल पंप परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.

पूर परिस्थितीची पाहणी करुन पालकमंत्री सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला. डायमंड हॉस्पिटलमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना हॉस्पिटल मधून सुखरुप बाहेर काढण्यासाठी पालकमंत्री श्री. पाटील स्वतः पुढे सरसावले आहेत.

भर पावसात पुरग्रस्तांसाठी मदतकार्य करणारे एनडीआरएफचे जवान व स्वयंसेवकांच्या कामाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कौतुक केले.

जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती उद्भवल्यास पूरग्रस्तांचे तात्काळ स्थलांतर व मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या आणखी 4 टीमची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.

जिल्ह्यात एनडीआरएफच्या 2 टीम काल दुपारी तर आज आणखी एक टीम दाखल झाली असून आणखी 4 टीम आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. प्रत्येकी एका टीममध्ये 3 बोटी, 3 अधिकारी, 25 जवान आहेत.

Back to top button