वंचित विकास, जाणीव संघटनेचे संस्थापक विलास चाफेकर यांचे निधन

वंचित विकास, जाणीव संघटनेचे संस्थापक विलास चाफेकर यांचे निधन
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जाणीव संघटना, वंचित विकास संस्थेचे संस्थापक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास चाफेकर यांचे आज (दि.२४) मध्यरात्री निधन झाले. विलास चाफेकर हे ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

वेश्या वस्तीतील मुलांसाठी, समाजातील वंचित घटकांसाठी, हातगाडी व्यावसायिकांसाठी, कष्टकर्‍यांसाठी, आदिवासी, महिला, शहरी व ग्रामीण भागातील दीनदुबळ्यांसाठी चाफेकर यांनी आपले जीवन वेचले.

ज्यांना समाजाने नाकारले, अशा निरागस व अस्तित्वहीन जीवांसाठीची त्यांची धडपड आणि त्यातून उभे राहिलेले प्रगतीशील युवक आज मोठ्या संस्थांत काम करताहेत, हीच त्यांच्या कार्याची पावती!

मानवी मूल्यांशी कधीही तडजोड न करता आणि आलेल्या संकटांना कवटाळून बसण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढायचा याच्यावर त्यांचा अधिक भर होता.

सखोल अभ्यास, सुस्पष्ट विचार, परखड मत मांडण्याचा त्यांचा शिरस्ता होता.

'मी, माझं, माझ्यामुळं, माझ्यासाठी'

'मी, माझं, माझ्यामुळं, माझ्यासाठी' या शब्दांच्या पलीकडे निस्वार्थी कार्य करणारे चाफेकर सर होते.

ठाणेवासी मुंबईकर असलेल्या चाफेकर सरांनी मुंबई विद्यापीठात सुवर्णपदकासह एमएची पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले.

१९७७ ला पीएचडी करुन पुण्यातच स्थिरावले.

१९८२ ला जाणीव संघटना आणि १९८५ ला वंचित विकास संस्थेची स्थापना करुन सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवली.

वैयक्तिक प्रपंच न मांडता समाजाची, भवतालातील वंचिताची काळजी वाहणे हीच धारणा ठेवत स्वत:ला उत्तममाणूस, कार्यकर्ता आणि शिक्षक म्हणून घडविले.

चाफेकर यांच्या नि:स्वार्थी कार्यामुळं जनमानसातून त्यांना 'सर' ही पदवी बहाल झाली.

कोणत्याही वैयक्तिक अभिलाषेशिवाय त्यांनी उभारलेल्या कार्याचा आज वटवृक्ष झाला आहे.

वंचित विकास, जाणीव संघटना याबरोबरच नीहार, चंडिकादेवी आदिवासी मुलींचे वसतिगृह, लातूरमधील सबला महिला केंद्र, मानवनिर्माण, गोसावी वस्ती येथील प्रकल्प, जाणीव युवा अशा अनेक संस्थांची निर्मिती त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.

खर्‍या अर्थाने तेच एक संस्था

खर्‍या अर्थाने तेच एक संस्था होते. आज संस्थेचे कार्य महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातही सुरु आहे.

या सगळ्या कार्यात चाफेकर सरांना समाजातील दात्यांची साथ मिळाली.

अनेक देणगीदारांच्या आर्थिक सहकार्याने संस्था उभारत गेली.

चाफेकर यांच्या संस्थेचा नियमित संवाद व्हावा, या उद्देशाने रानवारा, संवादिनी आदी प्रकाशने सुरु केली.

सामाजिक कामाबरोबरच चाफेकर सरांनी आपल्यातला कलाकार, खेळाडू, शिक्षक, पत्रकार, नाटककारही जपला होता.

शालेय जीवनापासून विद्यार्थी संघटना, ग्रामीण शेतमजुर, मुंबईतील वेश्यावस्ती, धारावी झोपड़पट्टी, आणीबाणीचा लढा, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ एज्युकेशनच्या प्रकल्पातून त्यांनी काम केले होते.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ अनुभवलेले चाफेकर सर सुराज्य प्राप्तीसाठी यथोचित प्रयत्न करत होते.

समाजातील तळाच्या, शेवटच्या माणसापर्यंत सुखसमाधान पोहोचावे, यासाठी अखेरपर्यंत कार्यरत राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news