कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठाआठवडाभर बंद राहण्याची शक्यता | पुढारी

कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठाआठवडाभर बंद राहण्याची शक्यता

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठाआठवडाभर बंद राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहरासाठी पाणी उपसा करणारी पंचगंगा व भोगावती नदीपात्रातील केंद्रे महापुराच्या विळख्यात सापडली आहेत. पाणी पुरवठ्याची सर्व यंत्रणा पाण्यात बुडाली असल्याने महापालिकेने उपसा बंद केला आहे.

परिणामी, कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारपासून बंद राहणार आहे. पुराचे पाणी ओसरेपर्यंत म्हणजेच सुमारे आठवडाभर पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत शहरवासीयांचे पाण्याशिवाय प्रचंड हाल होणार आहेत.

2019 मध्ये 22 दिवस पाणीपुरवठा बंद…

दरम्यान, 2019 मधील महापुराच्या काळात शहरात तब्बल 22 दिवस पाणीपुरवठा झाला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर महापुराच्या पाण्यातून उपसा केंद्रे रिकामी झाल्यानंतर त्यांची देखभाल-दुरुस्ती करूनच ती सुरू केली जाणार आहेत. परिणामी, आठवडाभरापेक्षा जास्त कालावधीसाठी शहराचा पाणीपुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेच्या वतीने टँकरद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

सुमारे सहा लाख लोकसंख्येच्या शहराला पंचगंगा व भोगावती नदीतून पाणी उपसा करून पुरवठा केला जातो. पंचगंगा नदीतील पाणी शिंगणापूर उपसा केंद्रात तर बालिंगा व नागदेववाडी केंद्रासाठी भोगावतीतून पाणी उपसा केले जाते. गेले तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने दोन्ही नद्या तुडुंब भरल्या आहेत.

शुक्रवारी पहाटे नद्यांना महापूर आला. परिणामी, नदी काठावर असलेली उपसा केंद्रे पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. गुरुवारी दिवसभरात उपसा केलेला आणि भरलेल्या टाक्यातील पाणीपुरवठा शुक्रवारी होईल. त्यानंतर मात्र उपसा बंद होणार असल्याने पाण्याचा ठणठणाट असेल.

महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे आठ टँकर आहेत. खासगी 25 टँकर घेण्यात येणार आहेत. सांगली, सातारा, मिरजहून टँकरची मागणी करण्यात आली आहे. पाच टँकर सायंकाळी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आणखी टँकरची आवश्यकता असल्याचे

जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले आहे. कोल्हापूर शहरातील सर्व खासगी टँकरही ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्याद्वारे शहरवासीयांना येत्या काही दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार असल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button