‘उसवण’मध्ये शिलाई कामगाराच्या जीवनाचा संघर्ष : देविदास सौदागर | पुढारी

'उसवण'मध्ये शिलाई कामगाराच्या जीवनाचा संघर्ष : देविदास सौदागर

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : शिलाई कामगार आणि शिलाई व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची व्यथा आणि संघर्ष आपण ‘उसवण’ या कादंबरीतून मांडला आहे. अखिल भारतीय साहित्य पुरस्कार मिळाल्याने दोन पिढ्यांचा संघर्ष आणि लॉकडाऊन नंतर निर्माण झालेली परिस्थिती याची नोंद घेतली गेल्याचे समाधान आहे, असे सांगत पुरस्कार विजेते देविदास सौदागर यांनी शनिवारी (दि.१५) आनंद व्यक्त केला.

शालेय जीवनापासून कथा-कादंबरीच्या वाचनाची आवड असणारे देविदास सौदागर यांचा जन्म तुळजापूर येथे झाला. त्यांनी पहिली ते सातवीपर्यंत रामवर्धिनी प्रशाला येथे प्राथमिक शिक्षण व कुलस्वामिनी विद्यालय येथे माध्यमिक शिक्षण घेतले. अकरावी बारावीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे घेतले. परंतु ,२०१९ मध्ये बारावी वाणिज्य शाखेतून अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी बहिस्थ टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांमधून पदवी संपादन केली. इतिहास विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी टिळक विद्यापीठामधून संपादन केली. त्यानंतर २०२३ मध्ये ते बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. मुलाला पुरस्कार मिळाल्याचे समजल्यानंतर आई बालिकाबाई सौदागर आणि वडील महादेव सौदागर यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

तुळजापूर येथील कोंडो प्लॉटिंगमध्ये देविदास सौदागर यांचे निवासस्थान आहे. त्यांचा कपडे शिलाईचा व्यवसाय आहे. कोरोना काळात हा व्यवसायही बंद करावा लागला होता. तोच संघर्ष सौदागर यांनी ‘उसवण’ कादंबरीतून मांडला आहे. या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जगण्याचा संघर्ष आणि रेडिमेड कपड्याच्या दुनियेमध्ये शिलाई काम करणाऱ्या कामगारांची झालेली होरपळ, या कामगारावर आलेले आर्थिक संकट, त्यामधून निर्माण झालेले कौटुंबिक प्रश्न याला आपण या कादंबरीतून वाचा फोडली आहे, असे सौदागर यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

ही कादंबरी परंपरागत शिलाई व्यवसाय आज कोणत्या स्थितीमध्ये आहे, याचे दर्शन घडविते. परंपरागत शिलाई काम करून ग्रामीण भाग आणि शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अलीकडच्या काळात रेडीमेड कपडे उपयोगात आणणे तसेच रेडिमेड कपड्याची मोठी बाजारपेठ उभी राहिल्यामुळे कपडे शिलाई करण्याचा व्यवसाय अडचणीत आलेला आहे. कोरोना संकट काळात तर दुकानाचे भाडे देणे देखील कठीण झाल्यामुळे तुळजापूर शहरामधील मंगळवार पेठ येथे असलेला सौदागर टेलर्स नावाचा आमचा व्यवसाय आम्हाला बंद करावा लागला होता, याची आठवण त्यांनी सांगितली.

वडील तुळजापूर येथील महात्मा फुले रात्र शाळेमध्ये शिपाई म्हणून नोकरीस आहेत. ते देखील शिलाई व्यवसाय करत मोठे झाले आहेत. यापूर्वी त्यांनीही काही दुकानांमध्ये शिलाई कामगार म्हणून ३५ वर्ष काम केले आहे. या पुस्तकाचे लेखक देविदास सौदागर देखील अनेक वर्ष शिलाई काम करीत होते. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये दुकान बंद झाल्यानंतर त्यांनी शिवणकाम देखील बंद केले.
२०१८ मध्ये कवितासंग्रह कर्णाच्या मनातलं.. २०२१ मध्ये कवितासंग्रह ‘काळजात लेणं कोरताना’…. २०२२ मध्ये कादंबरी ‘उसवण’ अशी पुस्तके देविदास सौदागर यांनी लिहिली आहेत. ही कादंबरी देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स यांनी प्रकाशित केले असून हा पुरस्कार मिळाल्यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेचे कवी देविदास पाटील व कवी विजय देशमुख यांनी देविदास सौदागर यांच्या या कादंबरीला पुरस्कार मिळणे हा तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या साहित्याचा गौरव आहे असे सांगितले.

हेही वाचा :

Back to top button