गोंदियात भूकंप? नाना पटोलेंनी मध्यरात्री घेतली भाजपच्या माजी आमदाराची भेट | पुढारी

गोंदियात भूकंप? नाना पटोलेंनी मध्यरात्री घेतली भाजपच्या माजी आमदाराची भेट

गोंदिया; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर संपूर्ण राज्यभर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. जिल्ह्यातही विधानसभेच्या निवडणुकीला घेऊन गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहेत. अशातच नाना पटोले यांनी अनेकजण काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे सूचक वक्तव्य केले असतानाच शुक्रवार (दि.14) मध्यरात्री गोंदियात भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. ज्यामध्ये भंडारा-गोंदियाचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मेंढे यांनी विजयश्री मिळवल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत सामील असताना विशेष म्हणजे स्वतः खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या प्रचारार्थ भंडारा-गोंदिया दोन्ही जिल्हे पिंजून काढले असताना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सद्या भाजपमध्ये मंथन सुरु आहे.

मात्र, दुसरीकडे, लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे अनेकजण काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे विधान केले होते. तर शुक्रवारी पटोले हे गोंदियाला आले असता माजी आमदार रमेश कुथे यांच्या घरी मध्यरात्री भेट दिली. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, कुथे हे भाजपचे ज्येष्ठ नेते असतानाच त्यांच्याकडे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदाची जबाबदारी आहे.

तर, यापूर्वी त्यांनी दोन वेळा शिवसेनेकडून आमदार पद भुषविले आहे. त्यांचे चिरंजीव सोनू कुथे हे सध्या जिल्हा परिषदेचे सभापती असून ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरु आहे. अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मध्यरात्री घेतलेली ही भेट गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणारी ठरणार असल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगू लागल्या आहेत.a

Back to top button