लक्ष्मण हाकेंच्या समर्थनात मुंबई-विशाखापट्टणम महामार्गांवर रस्ता रोको

लक्ष्मण हाकेंच्या समर्थनात मुंबई-विशाखापट्टणम महामार्गांवर रस्ता रोको

शिरूर; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आरक्षण बचावासाठी प्रा. लक्ष्मण हाके यांचे जालन्यातील वडीगोद्री येथे गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला समर्थन देण्यासाठी व महाराष्ट्र सरकारला धारेवर धरण्यासाठी सकल ओबीसी समाजाकडून मुंबई -विशाखापटणम महामार्गांवरील शिंगारवाडीफाटा येथे बुधवारी(दि.१९) सकाळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला असंख्य तरूणांनी प्रतिसाद दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे सातत्याने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे राज्य सरकारला नमते घ्यावे लागले आहे. मनोज जरांगे यांचा ओबीसीच्या कोठ्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. तर मराठा समाजाला ओबीसी कोठ्यातून आरक्षण दिल्यास बारा बलुतेदारासह, घटक समाजावर मोठा अन्याय होईल. यासाठी ओबीसी आरक्षण बचावासाठी प्रा. लक्ष्मण हाके त्यांच्या वतीने गेल्या सात दिवसापासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला महाराष्ट्रातून समर्थन मिळू लागले आहे. बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास मुंबई -विशाखापटनम या महामार्गावरती शिरूर तालुक्यातील शिंगारवाडीफाटा येथे परिसरातील ओबीसी बांधवांकडून रस्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला परिसरातील चकलांबा, तरडगव्हाण, शेकटा, शिंगारवाडी, वडाचीवाडी, तिंतरवणी, चोरपुरी, टकलेवाडी, फुलसांगवी, मार्कडवाडी आदी गावातून ओबीसी समाजातील समाजबांधवांनी आपला सहभाग नोंदवला. दोन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरती दोन्हीही बाजूला सुमारे एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी घोषणाबाजी करत आंदोलकांनी सरकारवर निशाणा साधत रोष व्यक्त केला.

शिंगारवाडीफाटा ते वडीगोद्री गुरूवारी रॅलीचे आयोजन

प्रा. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी गुरूवारी (दि.२०) सकाळी १० वाजता मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील दहा-बारा गावाच्या माध्यमातून शिंगारवाडी फाटा येथून मोटर सायकलसह विविध वाहनांची रॅली वडीगोद्रीला जाणार आहे. यासाठी जास्तीच्या संख्येने आंदोलनकर्त्यांनी रॅलीमध्ये सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आंदोलन समन्वयकाच्या वतीने करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news