धाराशिव – मुरूम येथील ग्रामदैवत श्री कपिलेश्वर महाराज यात्रा उत्साहात | पुढारी

धाराशिव - मुरूम येथील ग्रामदैवत श्री कपिलेश्वर महाराज यात्रा उत्साहात

मुरूम (धाराशिव) : पुढारी वृत्तसेवा – उमरगा तालुक्यातील मुरूम येथे श्रावण महिन्यात ग्रामदैवत श्री कपिलेश्वर महाराज यात्रेनिमित्त मंदिर समितीच्या वतीने गेले महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात संपूर्ण महिनाभर बसव पुराण कथेचे आयोजन करण्यात आले तर बुधवार वार दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातून श्री ग्रामदैवत कपिलेश्वरांची पारंपरिक वाद्याच्या गजरात पालखी शोभा यात्रा काढण्यात आली.

गेल्या ५९ वर्षांपासून सातत्याने श्रावण महिन्यात मुरूम येथील ग्रामदैवत श्री कपिलेश्वर महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम व यात्रेचे आयोजन करण्यात येते. आज बुधवार दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून श्री कपिलेश्वरांच्या मूर्तीची पालखीतून पारंपरिक वाद्याने शोभा यात्रा काढण्यात आली. यात डोक्यावर जलकुंभ घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

यामध्ये सुरुवातीस सकाळी मंदिरामध्ये पालखीचा अग्नी प्रवेश सोहळा संपन्न झाला. यात “अग्नी प्रवेश कार्यक्रमाला फार महत्त्व असून शहरातील व परिसरातील भाविक श्रद्धेने हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्याचबरोबर हातात शस्त्रे घेऊन सहभागी झालेली मंडळी या यात्रेचे मुख्य आकर्षण असतात तर कंटेकुर येथील शिव भजनी मंडळ व काही समाजाच्या काठ्या असतात.

सन १९६४ पासून मोठ्या भक्ती भावाने ग्रामदैवत श्री कपिलेश्वरांची यात्रा पार पडत आहेत. श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून आजतागायत ५९ वर्षे अखंडपणे यात्रेची परंपरा जपली असल्याचे येथील ज्येष्ठ मंडळी सांगतात. मंदिर संस्थानच्या वतीने कथा श्रवण करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना महिनाभर दासोह (प्रसादाचे) आयोजन करण्यात येते. शेवटच्या दिवशी श्रीराम कुलकर्णी यांच्यातर्फे दासोहचे आयोजन करण्यात आले.

यात्रेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष, काशी, श्रीशैल्यम व उज्जैन पिठाचे विश्वस्त बापूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कपिलेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वात पार पाडले जाते. तर त्यांचे सहकारी व हनुमान चौक परिसरातील भाविक संपूर्ण महिनाभर परिश्रम घेऊन ही यात्रा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतात. यात शहरातील सर्वच युवक सहभाग नोंदवत असतात.

Back to top button