हतनूर येथील आद्रक वासिंग सेंटरवरील खड्ड्यात पडून तरूण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू | पुढारी

हतनूर येथील आद्रक वासिंग सेंटरवरील खड्ड्यात पडून तरूण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

हतनूर; पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील हतनूर येथे एका शेतकऱ्याचा आद्रक वासिंग सेंटरवरील खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना आज (दि. १६) सकाळी घडली. मृत तरुण शेतकरी हा खुलताबाद तालुक्यातील सालुखेडा  येथील आहे

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर शिवारात पांडुरंग आनंदा शिंदे यांच्या शेतातील आद्रक वासिंग सेंटर येथे ही घटना घडली. नितीन कैलास काळे (वय २२, रा.सालुखेडा ता.खुलताबाद) असे मृत्‍यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (दि १५) रात्री नितीन काळे हा हतनूर येथे आद्रक वासिंग सेंटरवर काही कामानिमित्त आलेला होता. याठिकाणी आद्रक धुतल्यानंतर खराब पाणी व आद्रक धुतलेल्या मातीचा गाळ साठविण्यासाठी मोठा खड्डा करून ठेवलेला होता. या खड्डयाचा गाळाचा अंदाज आला नसल्याने खड्ड्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला.

नितिन यांचे वडील कैलास काळे हे मुलाला पाहण्यासाठी आले असता ही घटना उघडकीस आली. नितीन काळे हा गाळात पडला असल्याचे पाहिले असता पोलीसांनी त्याला बाहेर काढले. हतनूर येथे शासकीय दवाखान्यात नेले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या घटनेमुळे आई वडिलांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई, वडील,भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे.

Back to top button