मोठी बातमी: मनोज जरांगे यांच्यासह ५९ आंदोलकांवर गुन्हा दाखल | पुढारी

मोठी बातमी: मनोज जरांगे यांच्यासह ५९ आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिरूर कासार : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदाेलनाचे नेते मनोज-जरांगे पाटील यांच्यासह ५९ आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. बीडच्या शिरूर अमळनेर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

मराठा आरक्षण प्रकरणी सगे-सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षण प्रश्‍नी विनापरवाना रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शिरूर तालुक्यात रविवारी दहा ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले. दरम्यान, नांदूर ते शिरूर व अमळनेर ते बीड रोडवर नांदूर फाटा येथे मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. मनोज जरांगे यांच्या तोंडी आदेशानुसार बेकायदेशीर जमाव जमवून रस्त्याच्या मध्यभागी बसून जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाचे उल्लघन केले. विनापरवाना, बेकायदेशीर रस्ता अडवल्याप्रकरणी पोलीस गणेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश धोकरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजगार वसंत जायभाये करत आहेत.

जरांगेंचे आमरण उपोषण मागे; पण साखळी उपोषण सुरूच राहणार

शनिवार दि.१० फेब्रुवारीपासून सुरू असलेले उपोषण जरांगे-पाटील यांनी आज मागे घेतले. तसेच इथून पुढे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘माझा बळी घ्या; पण ‘सगेसोयरे’ची अंमलबजावणी करूनच घेणार’ या  भूमिकेवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे. दोन दिवसांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असून, अंतरवालीत साखळी उपोषण सुरुच राहणार असल्‍याचे जरांगे पाटील यांनी सोमवारी (दि.२६) स्पष्ट केले.

हेही वाचा:

Back to top button