

शेवगाव /नगर : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जात असल्याची माहिती मिळताच, छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील कर्हेटाकळी येथे तगडा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला.
मराठा आरक्षणा संदर्भात अंतरवाली सराटी येथे रविवारी (दि.25) मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची बैठक घेतली. सदर बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा आरोप केला. एवढेच नाहीतर त्यांना माझा बळी हवा असेल तर, मी सागर बंगल्यावर येतो, असा इशारा जरांगे यांनी दिला.
त्यानंतर लागोलाग जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले. त्यांच्या निर्णयाने मराठा समाज मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाला आहे. पैठण, शेवगाव मार्गे ते मुंबईला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कर्हेटाकळी या ठिकाणी रविवारी दुपारी 4 वाजता मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, प्रांताधिकारी प्रसाद मते, नगर ग्रामीण उपविभागीय अधिकारी संपत भोसले, शेवगाव उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, तहसीलदार प्रशांत सांगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, शेवगाव पोलिस निरीक्षक दिगंबर भताने, दंगल नियंत्रण पथक, स्थानिक गुन्हे शाखा पथक, शेवगावचे पोलिस, असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. जरांगे पाटील नेमके कोणत्या मार्गे जात आहेत, याची माहिती मिळत नसल्याने रात्री उशिरापर्यंत हा बंदोबस्त असल्याने सीमेवर उजेडाची व्यवस्था करण्यात आली होती. तर, तैनात करण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्ताने वेगवेगळे तर्कवितर्क केले जात होते.
मराठवाड्यातील लोक पाथर्डी रस्त्याने मुंबईकडे जाणार असल्याने चांदबिबी महालाच्या पायथ्याशी पाथर्डी रस्त्यावर पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे. तेथे बॅरिकेटही आणून ठेवण्यात आले आहेत. मराठा आरक्षण ओबीसीतूनच मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंंबईकडे निघाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील मराठा बांधवही मुंबईच्या दिशेने निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा पोलिस दल अलर्ट झाले असून, मराठवाड्यातून येणार्या मार्गावर बंदोबस्त लावण्यास सुरुवात केली आहे.
बंदोबस्तामध्ये नगर शहराचे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली तोफखाना पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, भिंगारचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्यासह सुमारे 100 कर्मचारी तैनात आहेत. पुढील आदेश येईपर्यंत बंदोबस्त तैनात राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा