Ujani Dam : ‘उजनी’त 11 टक्केच पाणीसाठा | पुढारी

Ujani Dam : ‘उजनी’त 11 टक्केच पाणीसाठा

भिगवण; पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी मार्चच्या अखेरपर्यंत यशवंत जलाशयात (उजनी) 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध असतो. यंदा जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात जलाशयात 11 टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाण्याची भीषणता आताच तोंड वर काढू लागली आहे. (Ujani Dam)

पाण्याच्या या तीव्र टंचाईमुळे पाणलोट क्षेत्राच्या कडेच्या गावांसमोर तहान कशी भागवायची, हा यक्ष प्रश्न उभा आहे. धरणावर अवलंबून असलेला शेती व मासेमारी व्यवसायावर संकट उभे राहिले आहे. पाण्याची नीचांकी पाणी पातळी लक्षात घेता यंदा उजनी जलाशय कोरडा पडतोय की काय याचीही भीती व्यक्त होत आहे. यंदा उजनीत अवघा 60 टक्के एवढाच पाणीसाठा उपलब्ध झाला होता. (Ujani Dam)

हजारो कुटुंबांची मासेमारी संकटात

शेतीप्रमाणेच धरणावर मासेमारी व्यवसायावर हजारो कुटुंब अवलंबून आहेत. आधीच हा व्यवसाय सरकारच्या लाल फितीत अडकून पडल्याने धोक्यात सापडला आहे. शेकडो माशांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. यातून मत्स्यसंपदा व जैविक साखळी तुटून पडली आहे. त्यातच आता पाणी टंचाईची भर पडल्याने हा व्यवसाय अधिकच अडचणीत सापडण्याची शक्यता मच्छीमार व्यक्त करीत आहेत.

पुणे, नगर, सोलापूर अवलंबून

महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे 117 टीएमसी पाणीसाठा असलेले दुसर्‍या क्रमांकाचे धरण म्हणून ‘उजनी’कडे पाहिले जाते. या धरणावर पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसिंचन व औद्योगिकीकरण, मासेमारी व्यवसायही मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.

हेही वाचा : 

Back to top button