नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरावरून आक्रमक आणि चिथावणीखोर वक्तव्ये न करण्याच्या सूचना मंत्र्यांना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे वातावरण कलुषित होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना भडकावू अथवा प्रक्षोभक वक्तव्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा क्षण ऐतिहासिक आहे. आक्रमक वक्तव्य करून मंत्र्यांनी सामाजिक वातावरण गढूळ करू नये. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला गालबोट लागेल, अशा कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करू नये. या सोहळ्याबद्दल भक्तिभाव, आदर असायला हवा. राम मंदिर हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे मंत्र्यांनीही बोलताना तारतम्याने बोलण्याची गरज आहे. या सोहळ्याबद्दल आक्रमकपणे कोणत्याही प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य करू नये. आपापल्या मतदार संघातून लोकांना 22 जानेवारी रोजी अयोध्येत घेऊन यावे. जास्तीत जास्त लोकांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन, आशीर्वाद घेतला पाहिजे. यासाठी मंत्र्यांनी आपल्या मर्यादा ओळखून वर्तन ठेवावे, अशा शब्दात मोदी यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सूचना दिल्या आहेत.
राम मंदिर हा भाजपच्या अजेंड्यावरील विषय आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरून भाजपने राजकारण सुरू केल्याची टीका
विरोधकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी मंत्र्यांना कानपिचक्या दिल्याचे समजते.
हेही वाचा :