छत्रपती संभाजीनगर : पाणी टंचाईमुळे मोठ्या बांधकामांना स्थगिती; जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निर्देश | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : पाणी टंचाईमुळे मोठ्या बांधकामांना स्थगिती; जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निर्देश

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पाणी, चारा टंचाईची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रभावीपणे पाऊले उचलत आहे. याच अनुषंगाने जलसंधारण विभाग, महानगर पालिकेकडून दररोज आढावा घेतला जात आहे. जिथे पाणी टंचाईची अडचण असेल तेथील ग्रामपंचायतींनी पुढच्या तीन दिवसात तहसीलदारांकडे टँकरची मागणी नोंदवावी. त्यावर चौथ्या दिवशी उपाययोजना केली जाईल. तर पाणी टंचाईची परिस्थिती पाहता मोठ्या बांधकामांना लागणाऱ्या पाण्याचा विचार विचारात घेवून १५ जूनपर्यंत ही कामे थांबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तहसीलदारांना दिले आहेत. बुधवारी (दि.22) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर (दि.१६) मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी प्रश्न, खरीप लागवड, खते आणि बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यावर बैठका घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या ४१२ गावे तसेच ६१ वाडीवस्त्यांवर ६७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर २२५ गावांसाठी ३४६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले.

१० जूनपर्यंत मान्सून सुरु होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मात्र, प्रशासनाने जून अखेरपर्यंतचे नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी यांनी टंचाईची परिस्थिती, पाण्यातील दोष, चारा टंचाईबाबतच्या सूचना केल्या आहेत. जलस्रोतांच्या ५०० मीटरपर्यंत नव्याने बोअर आणि विहिरी खोदू नये, अशाही सूचना जिल्हाधिकारी स्वामी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

टँकरच्या फेऱ्यांबाबत पारदर्शकता येण्यासाठी आणि पाण्याचा दर्जा नियंत्रित ठेवण्यासाठी पाच दिवसांपासून तपासणी केली जात आहे. विंधन विहिरी, विहिरींचे पुनर्भरण करण्यासाठी ४० दिवसात नियोजन करण्याच्याही सूचना केल्या आहेत. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ११९ गावांमधील ३ हजार ५२१ कामांचा समावेश होता. त्यापैकी सुमारे १२०० कामे पुर्ण झाली आहेत. तर २ हजार १४० कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे.

उद्योगांची पाणी कपात नाही

काही दिवसांपुर्वी उद्योगांचे पाणी कपात करण्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. पण जलसंपदा विभागासोबत बैठक घेतल्यानंतर पाणी कपातीमुळे विकासाला खीळ बसू नये, असा विचार बैठकीत मांडण्यात आला. त्या अनुषंगाने औद्योगिक क्षेत्राचे पाणी बंद करण्याची आवश्यता नसल्याचे कळविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button