नांदेड: बनवेगिरी भोवली; श्री तुळजाभवानी जिनिंगच्या माजी सचिवावर गुन्हा दाखल | पुढारी

नांदेड: बनवेगिरी भोवली; श्री तुळजाभवानी जिनिंगच्या माजी सचिवावर गुन्हा दाखल

सय्यद जाफर

नरसीफाटा: नूतन संचालक मंडळाने पदावरुन कमी केल्यानंतरही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडील सुनावणीस उपस्थित राहून अधिकार नसताना स्वत:च्या सहीने बनावट व दिशाभूल करणारी कागदपञे सादर करत संस्थेची व शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी नरसी (ता. नायगाव) येथील श्री. तुळजाभवानी जिनिंग अँन्ड प्रेसिंग सहकारी संस्थेचे माजी सचिव चंद्रकांत श्रीरामवार यांच्यावर रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामुळे श्री.तुळजाभवानी जिनिंगमध्ये यापूर्वी झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात जिल्ह्याच्या राजकारणातील काही बडे मासे कारवाईच्या गळाला लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

श्री. तुळजाभवानी जिनिंग सहकारी संस्थेची काही महिन्यांपूर्वीच निवडणूक पार पडली आहे. नूतन चेअरमन श्रावण शंकरराव भिलवंडे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ सध्या या संस्थेचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवत आहे. दरम्यान नुतन संचालक मंडळ निवडीपूर्वी येथील स्थावर मालमत्ता व जमीन विक्री, इतर गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन सचिव चंद्रकांत श्रीरामवार यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप होता. त्यामुळे नुतन संचालक मंडळाने कारभार हाती घेताच संस्थेचे सचिव चंद्रकांत श्रीरामवार यांना दि. १०/२/ २०२३ रोजी सचिव पदावरुन कमी करत कार्यमुक्त केले. तसा अहवाल जिल्हा पातळीवरील संबधित वरिष्ठास सादरही करण्यात आला. त्यानंतर व्यंकट जिल्हावार यांच्याकडे सचिव पदाचा कार्यभार सोपवण्यात आला.

याच दरम्यान जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नांदेड यांच्यासमोर सहकार कायदा कलम ११ अन्वये दाखल झालेल्या एका तक्रारीत सुरु असलेल्या सुनावणी वेळी सचिव पदावर नसताना देखील चंद्रकांत श्रीरामवार यांनी उपस्थिती लावली. तसेच सदर प्रकरणात काही बनावट व दिशाभूल करणारी कागदपञे स्वताच्या स्वाक्षरीने दाखल केली. तसेच संस्थेचे काही रेकॉर्ड व अभिलेखे दडवून ठेवली. सुनावणी दरम्यान माजी सचिव चंद्रकांत श्रीरामवार यांची ही फसवेगिरी निदर्शनास येताच श्री. तुळजाभवानी जिनिंग सहकारी संस्थेचे विद्यमान सचिव व्यंकट जिल्हावार यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे संस्थेची फसवणूक करणाऱ्या चंद्रकात श्रीरामवार यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. एकंदर सर्व प्रकरण व चंद्रकात श्रीरामवार यांची बनवाबनवी पाहता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी संस्थेस कायदेशीर कारवाईची मुभा असल्याचे आदेशीत केले.

त्यानुसार विद्यमान सचिव व्यंकट उद्धवराव जिल्हावार यांनी १४ ऑक्टोबररोजी रामतीर्थ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरुन माजी सचिव चंद्रकांत गोविंदराव श्रीरामवार (रा. नरसी) यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये बनावट कागदपञे तयार करुन संस्थेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात चौकशी दरम्यान आणखी काही नविन खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील तुळजा भवानी जिनिंग सहकारी संस्था पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. नुतन संचालक मंडळाच्या निवडीपूर्वी येथे झालेले जमीन विक्री प्रकरण व इतर गैरव्यवहाराचे आरोप बघता आगामी काळात राजकीय वर्तुळातील काही बडे चेहरे कारवाईच्या कचाट्यात सापडतील, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.

हेही वाचा 

Back to top button