नांदेड : कर्ज फेडण्यासाठी किडनी विकणे आहे! जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील पत्रकाने खळबळ | पुढारी

नांदेड : कर्ज फेडण्यासाठी किडनी विकणे आहे! जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील पत्रकाने खळबळ

 नांदेड; पुढारी वृत्तसेवा : नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ५ किडनी विकणे असल्याचे पत्रक लावल्याने येथे एकच खळबळ उडाली.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बुधवारी (दि. १२) सकाळी दर्शनी भागात एक पत्रक चिकटवल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. या पत्रकावर ५ किडनी विकणे आहे, त्यानंतर स्वतःचा मोबाईल क्रमांकही लिहिण्यात आला होता. संबंधित क्रमांकावर विचारणा केली असता त्यावर एक महिला बोलत होती. या महिलेने मुदखेड तालुक्यातील वाई (वरदडा) येथील रहिवासी असल्याची माहिती फोनवरुन दिली.

सावकाराचे कर्ज  फेडण्यासाठी किडणी विक्रीचे पत्रक

संबंधित महिलेची त्या गावामध्ये चार ते पाच एकर जमीन असून त्यांनी गावातील तीन अवैध सावकारांकडून २ लाखांचे कर्ज घेतले होते. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी फुलशेतीवर कर्ज फेडले असतानाही अवैध सावकारांनी पैशासाठी तगादा लावला. सावकाराच्या पैसे वसुलीच्या जाचास कंटाळून मी व माझे कुटुंबीय मुंबई येथे मिळेल ते काम करत असून या सावकारांच्या कर्जाचे ओझे फेडण्यासाठी किडणी विक्रीचे पत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर चिटकवले असल्याची माहिती महिलेने यावेळी दिली.

Back to top button