पैठण : एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे सणासुदीत प्रवासी त्रस्त | पुढारी

पैठण : एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे सणासुदीत प्रवासी त्रस्त

पैठण : चंद्रकांत अंबिलवादे

पैठण येथील राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक सेवेतून निलंबित होण्याची पर्वा न करता संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे अचानक बंद झालेला बस सेवेमुळे प्रवाशांची सणासुदीच्या काळात तारांबळ उडाली आहे.

मागील आठवड्यात महाराष्ट्र राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कृती समितीने बसेस बंद करून बेमुदत उपोषण आंदोलन केले होते. मात्र दि. २९ सप्टेंबर रोजी औद्योगिक न्यायालयाने सदरील संप अवैध ठरवून प्रतिबंधक आदेश पारित केला असताना देखील निलंबित होण्याची काळजी न करता अचानक शुक्रवारी दुपारपासून पैठण येथील बस चालकांनी प्रलंबित मागण्यासाठी बस सेवा बंद करून संप पुकारला. या संपामध्ये मोठ्या प्रमाणावर चालत वाहक सहभागी झाल्यामुळे येथील आगार प्रमुख सुहास तरवडे यांनी चालक वाहकाला अचानक संप केला म्हणून कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस दिली आहे. दरम्यान या नोटीसला न घाबरता चालक वाहकयांनी संप सुरू ठेवला आहे.

दीपावली पाडवा, भाऊबीज या सणासुदीच्या काळात बस सेवा अचानक बंद झाल्यामुळे प्रवासी नागरिक, महिला यांची मोठी गैरसोय निर्माण झाले असून अनेक प्रवासी पैठण बस स्थानकावर बस सेवा सुरु होण्याची वाट पाहत. पैठण येथील राज्य परिवहन महामंडळाच्या चालक वाहक यांच्या संपाला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठवून देऊन संपामध्ये सहभाग घेतला असून कुंभकर्णी झोपेत असलेल्या राज्य शासनाला जागी करण्यासाठी संपाला पाठिंबा दिल्याचे नगराध्यक्ष सुरज लोळगे व भाऊसाहेब बोरुडे, बंडू आंधळे, प्रशांत आव्हाड यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले आहे.

Back to top button