Vijayrao Bhamble : शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा – आमदार विजयराव भांबळे | पुढारी

Vijayrao Bhamble : शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा - आमदार विजयराव भांबळे

जिंतूर: पुढारी वृत्तसेवा: जिंतूर, सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ पडल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. आमदार विजयराव भांबळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची आज (दि.६) पाहणी केली. शिष्टमंडळासह त्यांनी मौजे बामणी, वाघी, हलवीरा येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. Vijayrao Bhamble

जिंतूर सेलू तालुक्यात यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, पाण्याअभावी सोयाबीन, तूर, हळद, कापूस व इतर सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाण्याअभावी सोयाबीन वाळून जात आहे. कापूस, तूर, हळद आदी पिकांनी माना टाकल्या आहेत. लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे. त्यासाठी शासनाने वेळीच लक्ष देऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा. तसेच पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार भांबळे यांच्याकडे केली.
वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पाणी असून देखील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. उभे पीक शेतकऱ्यांच्या नजरेसमोर होरपळून जात आहे, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. Vijayrao Bhamble

Vijayrao Bhamble : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढणार

कोरडा दुष्काळ जाहीर करावा, सोयाबीन पिकास हेक्टरी 25 हजार रु अनुदान मंजूर करावे, कापूस पिकास हेक्टरी 30 हजार , तूर पिकास हेक्टरी 25 हजार, हळद पिकास हेक्टरी 40 हजार, फळबाग पिकास हेक्टरी 40 हजार, तसेच चालू वर्षाचा पीक विमा मंजूर करण्यात यावा, 24 तास वीज सुरळीत चालू ठेवण्यात यावी, कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये, मागील वर्षीचा पीक विमा वाटप करण्यात यावा, 2018 मधील अतिवृष्टीचे थकीत अनुदानाचे वाटप करावे, मागील वर्षाचे दुष्काळ अनुदान वाटप करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढणार असल्याचे आमदार विजयराव भांबळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी रामराव उबाळे, विश्वनाथ राठोड, बाळासाहेब घुगे, मुरलीधर मते, मनोज थिटे, गणेशराव इलग, विजय खिस्ते, माऊली गायकवाड, रमेश गीते, बर्डे आप्पा, सलीम काझी, राहुल घुले, गजानन कूटे, अंबादास राठोड, पवन जाधव, मांगीलाल राठोड, विश्वभर पडघन, जलील इनामदार, नवहाती सरपंच चव्हाण आदीसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button