परभणी : सेलूत सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

सेलू (जि. परभणी) : पुढारी वृत्तसेवा – जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा सेलू येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. सोमवार, ४ सप्टेंबर रोजी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने समाज बांधव व माता- भगिनींची मोठी उपस्थिती होती. लोकशाही पद्धतीने त्या घटनेचा तीव्र निषेध करत असताना सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आदोलंनाची सुरूवात जिजाऊ वंदनाने करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थितीत माता-भगिनींनी भजन गाऊन सरकारचा निषेध केला.
आंदोलनाची माहिती प्रस्ताविकात सर्जराव लहाने यांनी दिली. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने छगन शेरे, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, आदीसह समाज बांधव व माता-भगिनींनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात यावा, आंतरवाली सराटी येथील आदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे विनाशर्त मागे घेण्यात यावे. हल्ल्यामागे असलेले शासन व प्रशासनातील दोषी व्यक्तींवर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. या प्रमूख तिन मागण्या निवेदनाद्वारे व मनोगतातून राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंतरवाली येथील आदोलंकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला आहे. यात अनेक महिला, पुरूष, वयोवृद्ध नागरिक जखमी झाले आहेत, ही बाब प्रशानास लाजिरवाणी असल्याचे देखील निवेदनात नमूद करण्यात आहे. त्यामुळे येथील सकल मराठा समाजाकडून तहसीलदार दिनेश झांपले यांनी प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारून सकल मराठा समाजाच्या भावना शासनाला कळविण्याचे आश्वासन दिले.
तसेच शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आल्यामुळे सकल मराठा समाजाचे आभार मानले. या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सामिल झाले होते. आदोलंन शांततेच्या मार्गाने करण्यात आले होते. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला व भूमिकेला शहरातील वकील संघ. बी. आर. एस पक्ष, कम्युनिष्ट पक्ष, मुस्लीम समाज बांधव यांच्या वतीने पाठींबा देण्यात आला. सामुहिक राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप करण्यात आला.