परभणी : मराठा आरक्षणासाठी सावरगावच्या महिला उपसरपंचाने दिला राजीनामा | पुढारी

परभणी : मराठा आरक्षणासाठी सावरगावच्या महिला उपसरपंचाने दिला राजीनामा

मानवत; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मानवत तालुक्यातील सकल मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. आज बुधवारी (दि.६) तालुक्यातील सावरगाव खुर्द येथील महिला उपसरपंचाने उपसरपंच पदाचा व ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे . मराठा आरक्षणासाठी हा राज्यातील हा पहिलाच राजीनामा असावा .

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मानवत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसाचा कडकडीत बंद, निवेदन, मोर्चा , मनोज जरांगे पाटलांना शिष्टमंडळच्या भेटीनंतर आता राजीनामा अस्त्र उपसण्यात आल्याचे दिसून येत आहे.  सावरगाव खुर्द येथील महिला उपसरपंच सरस्वती कान्होजी जाधव यांनी आपल्या उपसरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यपदाचाही राजीनामा आज सावरगावचे सरपंच व ग्रामसेवकाकडे दिल्याने खळबळ उडाली आहे . या राजीनामा अस्त्राचे लोण राज्यभर पसरण्याची शक्यता आहे .

५४ गावात लाक्षणिक उपोषण

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने तालुक्यातील एकूण ५४ गावात शुक्रवारी (दि. ८ ) सकाळी ९:३० ते सायंकाळी ५ पर्यंत त्या गावातील ग्रामपंचायत किंवा मध्यवर्ती ठिकाणी तसेच सोमवारी ( दि.११) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर हजारोंच्या उपस्थितीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे .

Back to top button