परभणी: मानवतचे नायब तहसीलदार सेवेतून निलंबित | पुढारी

परभणी: मानवतचे नायब तहसीलदार सेवेतून निलंबित

मानवत: पुढारी वृत्तसेवा : मानवत तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार (निवडणूक) नकुल वाघुंडे यांना परभणीचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शासन सेवेतून निलंबित केले. निवडणुकीसारख्या महत्वाच्या विषयात वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे, पदभार नसताना अधिकाराचा गैरवापर करणे, या प्रकरणी त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ४(१) अन्वये ही कारवाई करण्यात आले.

नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांच्याकडे पाथरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार ५ ऑक्टोबर २०२१ ते ११ एप्रिल २०२२ या कालावधीत होता. तथापि पदभार संपल्यावर ३१ मे २०२२ मध्ये एका बांधकामास त्यांनी मंजुरी दिली होती. सदरील गैरप्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आला होता.

यापूर्वीही नकुल वाघुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२३ दरम्यान आयोजित निवडणूक प्रशिक्षणास गैरहजरी लावली होती. मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने २८ जून २०२३ च्या प्रशिक्षणास देखील ते गैरहजर होते. या व्यतिरिक्त केंद्राध्यक्ष पदाचे आदेश देऊनही कामकाज न पाहणे, प्रकरणात जाणीवपूर्वक टाळाटाळ करणे, वरिष्ठांचे आदेशाचे पालन न करणे, या सर्व कारणांवरून त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे ४ जुलैच्या आदेशात म्हटले आहे. निलंबित कालावधीत त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे असेल. त्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

हेही वाचा 

Back to top button