परभणी : क्रुझर-आयशरच्या जोरदार धडकेत एक ठार; एक गंभीर जखमी | पुढारी

परभणी : क्रुझर-आयशरच्या जोरदार धडकेत एक ठार; एक गंभीर जखमी

परभणी : पुढारी वृत्‍तसेवा गंगाखेड-परभणी राष्ट्रीय महामार्गावरील महातपुरी फाट्यावर क्रुझर व आयशर गाडीची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात गंगाखेड-पोखरणी नृसिंह ता. परभणी येथे देवदर्शनासाठी निघालेल्‍या शहरातील श्रीधर भानुदास पवार या (५५ वर्षीय) व्यक्‍तीचा जागीच मृत्‍यू झाला. दरम्‍यान क्रुझरचा चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (शनिवार) पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास घडला.

या विषयी अधिक माहिती अशी की, शनिवार निमित्त परभणी तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान पोखर्णी (नृसिंह) येथे देवदर्शनासाठी गंगाखेड शहरातील श्रीधर भानुदास पवार रा.भाग्यनगर हे क्रुझर गाडीने (क्र. एम एच २२- एएम-८८७६) परभणीकडे निघाले होते. यावेळी महातपुरी फाट्यावर समोरून येणाऱ्या आयशर (क्र.- एच एच २६-डीई- ८५६५) सोबत क्रुझर च्या झालेल्या जोरदार धडकेत श्रीधर पवार हे जागीच मृत्युमुखी पडले, तर क्रुझर चालक साबळे राहणार धडेवाडी धनेवाडी हा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
या अपघातात आयशर वाहन चालकाला सोनपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील भाग्यनगर येथे रहिवासी असलेले अपघातातील मृत श्रीधर भानुदास पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान या अपघातस्थळी सोनपेठ पोलिसांनी धाव घेत आयशर वाहन व चालकास ताब्यात घेतले असून, या प्रकरणी पुढील तपास सोनपेठ पोलीस ठाण्याचे महातपुरी बीट जमादार मंचक फड हे करीत आहेत.

धोकादायक वळण, रस्त्याची डागडुजी ठरले मृत्यूस कारण

दरम्यान गंगाखेड – परभणी राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत सुमार दर्जाचा झाला असून, विविध लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर या राष्ट्रीय महामार्गाची डागडुजीचे काम जागोजागी सुरू आहे. गुरुवारी सकाळी महातपुरी फाट्यावरील झालेल्या दोन वाहनातील अपघातास या महामार्गावरील जागोजागी होत असलेल्या डागडुजीचे काम व महातपूरी फाट्यावरील अत्यंत धोक्याचे वळण असल्याची चर्चा अपघातस्थळी होती.

हेही वाचा :  

Back to top button