परभणी : भगवान सानप बीआरएस मध्ये दाखल; गंगाखेड विधानसभेचं राजकीय समीकरण बदलणार | पुढारी

परभणी : भगवान सानप बीआरएस मध्ये दाखल; गंगाखेड विधानसभेचं राजकीय समीकरण बदलणार

गंगाखेड ; पुढारी वृत्‍तसेवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ३ वेळेस संचालक व परभणी जिल्हा परिषदेचे ३ वेळेस सदस्य म्हणून तालुक्यातील कोद्री जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व केलेले विशेषत: तालुक्याच्या डोंगरी भागाचे युवा नेतृत्व म्हणून परिचित असलेले भगवान सानप यांनी गुरुवारी (दि.१३) सायंकाळी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलणार असून, मतदारसंघाला पुन्हा एक नवीन युवा उमेदवार या निमित्ताने मिळणार आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आगामी राजकारणाची दिशा विस्तारित करण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष लक्ष देण्यास प्रारंभ केला आहे. संघटनात्मक पक्ष वाढीवर राव हे स्वतः जातीने लक्ष देत आहेत. मराठवाड्यातील लक्षवेधी विधानसभा मतदारसंघ म्हणून गंगाखेड विधानसभेचा समावेश होतो. येथील विधानसभेचे राजकारण केवळ मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर लक्ष्मी अस्राने गाजत असते. नवीन व जुन्या उमेदवारांमध्ये मतदार कधी-कुठल्या वेळेस नवीन मतदाराला कुठल्या निमित्ताने संधी देईल याचा नेम नसतो. अशातच आगामी विधानसभा निवडणूक अगदी दीड वर्षावर आलेली असताना गंगाखेड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एका नवीन युवा नेतृत्वाचा उदय झाला आहे.

तालुक्यातील कोद्री जिल्हा परिषद गटाचे तीन वेळेस प्रतिनिधित्व केलेले, सतत तिसऱ्यांदा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर विद्यमान संचालक असलेले तसेच नुकत्याच झालेल्या गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर विक्रमी मताने निवडून येत महाविकास आघाडीचे तब्बल आठ उमेदवार निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचललेले भगवान सानप यांनी गुरुवारी अचानक तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा बीआरएसचे पक्षप्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी बीआरएस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश राज्य समन्वयक माजी आमदार भाई शंकरराव धोंडगे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिक कदम, महाराष्ट्राचे पक्ष प्रभारी तथा तेलंगणाचे खासदार बी.बी. पाटील यांचेसह बीआरएसचे काही प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत मागील अनेक निवडणुकीत विजयी मतांवर प्राबल्य दाखवणाऱ्या डोंगरी भागाचे महत्वाचे पॉकेट हाती असलेल्या भगवान सानप यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याने आगामी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाला एक नवीन युवा नेतृत्व तर मिळालेच आहे, शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बीआरएस प्रथमच राजकीयदृष्ट्या प्रभावी ठरू शकतो अशी चर्चा मतदारसंघात जोर धरत आहे.

रासपचे राज्यातील पहिले जि.प.सदस्य ते बीआरएस पक्षप्रवेश

भगवान सानप यांनी सन २०१२ ला कोद्री जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षाकडून महादेव जानकर यांच्या नेतृत्वात लढली. विशेषत: त्यांनी या निवडणुकीत विजयी प्राप्त करत राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्यातील पहिले जिल्हा परिषद सदस्य होण्याचा मान मिळवला होता हे विशेष ! कोद्री जिल्हा परिषद गटावर निर्विवाद राजकीय वर्चस्व असलेले व मागील दहा वर्षात अपक्षपणे राजकारण करणारे भगवान सानप हे कदाचित विधानसभे अगोदर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यास ते बीआरएस या पक्षाचेही पहिले जि. प. सदस्य होतील का ? अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा : 

Back to top button