बीड : एलसीबीची मोठी कारवाई; चारचाकी वाहनासह शस्त्रसाठा, दारू जप्त | पुढारी

बीड : एलसीबीची मोठी कारवाई; चारचाकी वाहनासह शस्त्रसाठा, दारू जप्त

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : एलसीबीच्या पोलीस निरिक्षक पदाचा पदभार स्वीकारताच पोलीस निरिक्षक संतोष साबळे यांनी धडाकेबाज कारवाया सुरु केल्या आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील पुसमध्ये गावठी दारूअड्ड्यावर शस्त्रसाठ्यासह तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात यश आले असून एक जण फरार झाला आहे. त्यांच्याकडून पिस्टल, तलवारी, कत्त्या व अवैध दारू २लाख ८५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी बर्दापुर पोलीस ठाण्यात चारही आरोपी विरोधात आर्मअ‍ॅक्टसह बर्दापुर पोलिसात अनाधिकृत हत्यार बाळगल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्रीचे धंदे सुरू असून धाब्यासह घरगुती ठिकाणी खुलेआम गावठी दारूसह विदेशी दारूचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील सचिन विश्‍वनाथ उदार यांच्या गावठी दारूच्या दुकानावर हत्याराचा धाक दाखवून दारू विक्री केली जाते याची माहिती बीडच्या एलसीबीला मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने सकाळी ८ वाजता पुस गाव गाठले. त्याठिकाणी देशी ,विदेशी सह दारू विक्री करताना तिघा जणांना रंगेहात पकडले. तर एक जण फरार झाला आहे.

आज सकाळी पोलिसांनी छापा मारला तेंव्हा आरोपी पळून जात असतांना त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी त्यांच्याकडून चारचाकीसह गावठी पिस्टल, मोठा घातक शस्त्रसाठा जप्त केला. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरिक्षक संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, सहाय्यक फौजदार तुळशीराम जगताप, पो.को. रामदास तांदळे, बाळकृष्ण जायभाये, विकास राठोड, सुशिला हजारे, स्वाती मुंडे, भागवत शेलारे, राजु पठाण, अर्जुन यादव, बिभिषण चव्हाण व वाहन चालक अतुल हराळे यांनी केली. या छापेमारीमध्ये सहकार्य केले.

हेही वाचलंत का?

Back to top button