‘मराठा वनवास यात्रा’ पाचशे किलोमीटर पायी चालत ६ जून रोजी मंत्रालयावर धडकणार | पुढारी

'मराठा वनवास यात्रा' पाचशे किलोमीटर पायी चालत ६ जून रोजी मंत्रालयावर धडकणार

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘मराठा वनवास यात्रा’ ही जवळपास ५०० किलोमीटर पायी चालत जात मुंबईत पोचणार आहे. ५०% च्या मर्यादेमध्ये ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निग्रही दावा यात्रेचे निमंत्रक योगेश केदार यांनी तुळजापुरात केला.

मराठा वनवास यात्रा तुळजापूर येथून तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन निघाली असून ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी मुंबईत मंत्रालयामध्ये धडकणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाज खूप मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने समन्वयाने मराठा समाजाला 11% टिकणारे कायमस्वरूपी आरक्षण दिले पाहिजे आणि हे दिल्याशिवाय आम्ही मंत्रालयाचा परिसर सोडणार नाही, असा दावा निमंत्रक योगेश केदार यांनी तुळजापुरात शुभारंभ प्रसंगी केला.

तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमर परमेश्वर पुजारी अतुल मलबा निमंत्रक योगेश केदार, कांचन राव पाटील, सुनील नागणे, विशाल रोचकरी यांच्यासह शेकडो मराठा समाजाचे कार्यकर्ते या यात्रेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

मराठा आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तुळजापूर ते मंत्रालय अशी वनवास यात्रा दि.६ में रोजी या वनवास यात्रेला तुळजापुरातून प्रारंभ झाला असून या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्तात ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार न होता ही वनवासी यात्रा तुळजापुरातून प्रस्थान झाली.

मराठा समाजाच्या ओबीसीत समावेश करून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा समाजाकडून मराठा वनवास यात्रेचे निमंत्रक योगेश केदार यांनी तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोर झालेल्या शुभारंभ कार्यक्रमात केली. येत्या ६ जून रोजी ही वनवास यात्रा मंत्रालयावर धडकणार आहे. तुळजाभवानी देवीच्या महाद्वारापासून भवानी रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांना अभिवादन करून ही यात्रा तुळजापुरातून बाहेर पडली.

ही यात्रा 475 किलोमीटर पायी चालत मुंबईकडे जात असून 95 ठिकाणी या यात्रेचा मुक्काम राहणार आहे. 33 मोठ्या सभा या दरम्यान होत आहेत. या यात्रेदरम्यान तीव्र उन्हाचा त्रास लक्षात घेऊन सकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत ही यात्रा पायी चालत पुढे जात आहे.

अधिक वाचा :

Back to top button