हिंगोली: वादळी वार्‍याने केळीच्या बागा भुईसपाट: लाखो रूपयांचे नुकसान | पुढारी

हिंगोली: वादळी वार्‍याने केळीच्या बागा भुईसपाट: लाखो रूपयांचे नुकसान

डोंगरकडा/वारंगा फाटा; पुढारी वृत्तसेवा : वादळी वारा व पावसामुळे कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, डोंगरकडा, दांडेगाव परिसरातील केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. वादळी वार्‍यामुळे संपूर्ण बागा आडव्या झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आज (दि. २५) दुपारी अडीचच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वार्‍यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने केळी उत्पादक शेतकर्‍याचे अवसान गळाले आहे.

मार्च महिन्यापासून सातत्याने कळमनुरी तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस तर कधी गारपीट होत आहे. मार्च महिन्यात झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, भाजीपाला, केळीला मोठा फटका बसला होता. अद्याप नुकसान भरपाईही मिळाली नसताना पुन्हा आज दुपारी या परिसरात जोराचा वारा व पाऊस झाला. काही ठिकाणी हरभर्‍याच्या आकाराच्या गाराही पडल्या. तुफान वादळी वार्‍यामुळे केळीच्या बागा आडव्या झाल्या. सध्या केळीची तोडणी सुरू असून शेतकर्‍यांच्या हातात दोन पैसे येण्यास सुरूवात झाली असतानाच अवकाळी पावसाने घात केला.

हातातोंडाशी आलेले केळीचे पीक अवकाळी पावसामुळे हातचे गेले आहे. केळीसाठी लाखो रूपयांचा लागवड खर्च अवकाळी पावसामुळे पाण्यात गेला आहे. शेतकर्‍यांच्या डोळ्यादेखत केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. त्यामुळे शेतकर्‍यांचे अवसान गळाले. तात्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना हेक्टरी किमान 1 लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील केळी उत्पादक शेतकर्‍यांमधून केली जात आहे.

हळद उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

मागील पंधरवाड्यापासून हळदीची काढणी व शिजवणी सुरू आहे. परंतु, सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. कायम ढगाळ वातावरण राहत असल्याने हळद उत्पादक शेतकर्‍यांसमोरील अडचणी वाढल्या असतानाच मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका हळद उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. पावसाच्या पाण्यात हळद भिजल्याने हळदीचा दर्जा खालावला आहे. परिणामी बाजारात हळदीला कवडीमोल दर मिळण्याची भीती व्यक्‍त होत आहे. हळद अवकाळी पावसात भिजल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले असून नुकसान भरपाईची मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचा 

Back to top button